⚡बांदा ता.०९-: टाळ चिपळ्यांचा गजर व मुखी विठ्ठल नामाचा जप करीत मडुरा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी काढलेली आषाढ दिंडी लक्षवेधी ठरली. प्रतिवर्षाप्रमाणे नाबर प्रशालेत आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक अभंग व गजर सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.
मडुरा तिठ्यापर्यंत काढलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा निसर्ग वाचवा अशा अनेक घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. दिंडीत विद्यार्थी पारंपारिक वारकरी वेषात सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापिका नीती साळगावकर, सहशिक्षिका प्राची परब, प्रतिक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, पालक सुप्रिया वारंग आदी उपस्थित होते.
