Headlines

भराडी मातेच्या सोहळ्यात नृत्याविष्कारांची रंगत…

आंगणेवाडीत सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिल्या दिवसाची रंगत:विविध नृत्यप्रकारांना रसिकांची दाद

⚡कुडाळ ता.१८-: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी आई भराडी मातेचा २२ वा सुवर्ण कलश वर्धापनदिन सोहळा १७ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यानिमित्त आंगणे कुटुंबीयांच्या वतीने मंदिर परिसरातील रंगमंचावर विविध धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित कलाकारांसह स्थानिक बालकलाकारांनी सादर केलेल्या विविधांगी नृत्याविष्कारांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेश वंदनाने झाली. त्यानंतर स्थानिक बालकलाकारांनी एकापेक्षा एक सरस नृत्यप्रकार सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. अदिती, दुर्वा, जागृती, जान्हवी, ईश्वरी आणि स्वामिनी यांनी ‘तू आंगणेवाडीची भराडीमाता सत्वाची’ या गीतावर समूहनृत्य सादर करत भराडी मातेचा जागर केला. तसेच ‘कजरा रे’ या गीतावरील नृत्यालाही रसिकांची दाद मिळाली.
परी, वेंदाश, मनवा, तनिश, देवेद्री आणि निनाद या चिमुकल्या कलाकारांनी साऊथ इंडियन नृत्यप्रकार सादर करत धमाल उडवली. ‘मनवा लागे… अंबाबाई उदो…’ या गीतावर चिमुकली श्रिया आंगणे हिने भक्तिमय नृत्य सादर केले. ‘दिल है छोटा’ या गीतावर ऋत्वि, सान्वी, हर्षा, वेदांश, मनवा आणि तनिष यांनी बहारदार नृत्य सादर केले. सान्वी आणि ऋत्विक यांनी ‘अफगाण जलेबी’ या गीतावर वेगळ्या शैलीतील नृत्य सादर केले.
कुटुंबासाठी सतत धडपडणाऱ्या व मुलांच्या भवितव्यासाठी झटणाऱ्या वडिलांचे योगदान अधोरेखित करणाऱ्या ‘बाबा मला कळलेच नाही’ या गीतावर श्रिया आंगणे हिने सादर केलेल्या भावस्पर्शी नृत्याने उपस्थितांना भावनिक केले. ‘घर मोरे परदेशिया’ या गीतावर अदितीने रंगत आणली, तर जान्हवी आणि जागृती यांनी ‘लंडन ठुमकदा’ या गीतावर हटके नृत्य सादर केले. स्वामिनी, ईश्वरी आणि दुर्गा यांच्या वेस्टर्न नृत्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय दीक्षा नाईक, दिया लुडबे आणि सिद्धेश पालव यांनीही आपले नृत्याविष्कार सादर केले.
स्थानिक मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि मुंबईस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. सहभागी सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी कार्याध्यक्ष बाळा आंगणे, सचिव काका आंगणे, बाबू आंगणे, अॅड. दिनेश आंगणे, जय आंगणे, सुशांत आंगणे, मुंबई येथील ‘कलारंजन’ प्रस्तुत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमातील कलाकार, ग्रामस्थ आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन बाबू आंगणे यांनी केले.

You cannot copy content of this page