मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील आंबडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.
यानिमित्त नवस फेडणे व नवीन नवस बोलणे हा कार्यक्रम दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. रात्री ११.३० वाजता देव रवळनाथाची पालखी मिरवणूक ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात येणार आहे. रात्री बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडगे फोडणे हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावकरी मंडळींनी केले आहे.
