कट्टा येथे २१ वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा; विद्यार्थ्यांना सेवानिधीचे वितरण

मालवण दि (प्रतिनिधी) :
“उच्च पदावर कार्यरत असतानाही साधेपणा, समाजवादावरील निष्ठा आणि जनतेच्या कल्याणाचा ध्यास कायम जपणारे प्रा. मधू दंडवते यांचे जीवन आजच्या पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहिताचे कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे प्रा. मधू दंडवते यांचा २१ वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रा. दंडवते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी दीपक भोगटे यांनी प्रा. दंडवते यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. पाच वेळा राजापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या दंडवते यांनी रेल्वेमंत्री, अर्थमंत्री तसेच नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषविली. त्यांच्या कार्यकाळात कोकण रेल्वेचा शुभारंभ झाला. विज्ञाननिष्ठ विचार, साधी राहणी आणि देहदानाचा निर्णय यातून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला, असे भोगटे यानी सांगितले.
किशोर शिरोडकर यांनी प्रा. दंडवते यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव कथन केले. समाजवादावरील त्यांची अखेरपर्यंत कायम राहिलेली निष्ठा, प्रभावी वक्तृत्व आणि साहित्यिक योगदान यांचा गौरव करत त्यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळणे हे भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
तळगाव हायस्कूलचे माजी शिक्षक पंडित बंडू माने यांनी आजच्या काळात समाजातील संवेदनशीलता कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या कृतीतून मुलांमध्ये संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी रुजवावी, असे आवाहन केले. प्रा. दंडवते यांच्या विचारांनुसार सेवांगणचे कार्य सुरू असून त्याला सर्वांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रा. मधू दंडवते सेवानिधीचे १२ विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.
यावेळी पंडित माने, बापू तळावडेकर, किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, दादा वंजारी, साक्षी अमरे, मनोज काळसेकर, बाळकृष्ण गोंधळी, विद्या चिंदरकर यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
