एकाच दिवशी पाच मोबाईल चोरीला:मंगळवारच्या बाजारादिवशी सायंकाळी घडल्या घटना..

कणकवली : शहरातील बाजारपेठेत मंगळवारी आठवडा बाजाराच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास मोबाईल चोरीच्या तब्बल पाच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. एकाच दिवशी पाच मोबाईल चोरीला गेल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारादिवशी सायंकाळच्या वेळी वेगवेगळ्या पाच व्यक्तींचे मोबाईल चोरीला गेले. यापैकी तीन जणांनी याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. विशेष म्हणजे, एकाच वेळी तीन मोबाईल हरवल्याचे संबंधितांच्या लक्षात आले नसल्याने या घटनांमागे मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आठवडा बाजाराच्या दिवशी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी हातसफाई केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऐन बाजाराच्या दिवशी घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांनी बाजारपेठेत वावरताना मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
