४० विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक

मालवण दि (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक कौशल्यांचे ज्ञान मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि स्वयंरोजगाराच्या संधींची ओळख व्हावी, या उद्देशाने कॉज टू कनेक्ट फाउंडेशन आणि वराडकर हायस्कूल, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व १७ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेत इयत्ता अकरावीतील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचे चार गट करून अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, ऊर्जा व पर्यावरण, बागकाम व शेती तंत्रज्ञान तसेच कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी मार्बल केक तयार करणे, २० फूट लांबीचे तोरण बनविणे, कोकडमा प्लांट तयार करणे आणि की होल्डर बनविण्याचे प्रात्यक्षिक घेतले.
दुसऱ्या दिवशी पंचखाद्य ड्रायफ्रुट लाडू तयार करणे, एक्स्टेन्शन बोर्डची माहिती, नारळ व पेंडेनसच्या पानांपासून फुले तयार करून पुष्परचना करणे तसेच तयार केलेल्या की होल्डरवर रंगकाम व सजावट करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत विविध कौशल्यांचा अनुभव घेतला. या कार्यशाळेच्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव श्री. सुनील नाईक व स्कुल कमिटी अध्यक्ष श्री. सुधीर वराडकर यांनी विद्यार्थ्यांना या समुदाय कौशल्य उपक्रमाबाबत शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
