शहर जलमय;गटार, नाल्यांची अर्धवट सफाई बनले प्रमुख कारण
⚡मालवण ता.०४-: मालवणात आज सकाळपासून धुवांधार कोसळणाऱ्या पावसाने मालवण वासीयांची तारांबळ उडाली असून सकाळी अवघ्या तासाभरात शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे मालवण शहर जलमय झाले असून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. यावर्षी नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील गटार व व्हाळ्यांची अर्धवट स्थितीत सफाई झाल्याने त्याचा फटका या मुसळधार पावसात शहराला बसला असून रस्त्यांसह अनेक ठिकाणी पाणी भरल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मालवणात काल विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज सकाळपासून जोरदार बॅटिंग करण्यास सुरू केली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शहरातील रस्ते तासाभरातच जलमय होऊन त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर अनेक सखल भागातही पाणी भरले आहे. तर काही घरांना पाण्याने वेढा दिला आहे. गटार व नाले सफाई योग्य पद्धतीने न झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येत असून यामुळे मालवण जलमय बनले आहे.
मालवण शहरातील एसटी स्टँड समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्त्यालगतच्या दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले आहे. तेथील राजापूरे यांच्या रस्त्यालगतच्या घरात पाणी शिरले आहे. तर भंडारी हायस्कुल रस्ता, टोपीवाला हायस्कुल रस्ता, नाट्यगृहासमोरील रस्ता, दैवज्ञ भवन रस्ता, पोस्टासमोरील मॅकेनिकल रोड यासह बाजारपेठेतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे रस्त्याने वाट काढताना वाहनचालक, नागरिक, शाळकरी मुले यांना कसरत करावी लागत आहे.
मालवण शहरासह तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळत असून घुमडे येथील श्री घुमडाई मंदिर परिसरातही घुडघ्याच्या वर पाणी साचले असून पूर्ण मंदिर पाण्याच्या वेढ्यात सापडले आहे.
