विद्यार्थी सेना नेते अमित ठाकरे मार्गदर्शन करणार
⚡कणकवली ता.०४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत ६ जुलै २०२२ रोजी कणकवली येथील भगवती हॉल, मराठा मंडळ रोड येथे दुपारी २.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली- देवगड- वैभववाडी या विभागाचा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आणि विद्यार्थी सेनेचा भव्य मेळावा संपन्न होणार आहे.
तरी कणकवली-देवगड-वैभववाडीतील मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनीही बहुसंख्येने उपस्थित राहून अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनसेचे कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हजारो लोक चाहते आहेत. त्याप्रमाणे कॉलेज तरुण/तरुणींमध्ये अमित ठाकरे यांच्या प्रगल्भ नेतृत्वामुळे जिल्ह्यातील शेकडो तरुणांना आकर्षण आहे. जिल्ह्यात वाढती बेरोजगारी, सत्ताधारी व विरोधी पक्षांचे तरुणांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झालेले असून केवळ सत्तेच्या खुर्चीकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचे काम मनसे करीत आहे. कोरोनाच्या काळात केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जनतेला मदत केली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, वाढती महागाई आणि राज्यात वाढलेली प्रचंड बेरोजगारी याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी मनसेशिवाय पर्याय नाही. म्हणूनच अमित ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरु केलेला असून अशा सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार ६ जुलै २०२२ रोजी दुपारी २.३० वाजता कणकवली येथील भगवती हॉलमध्ये मेळावा संपन्न होणार असून मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.
यावेळी अनेक विद्यार्थी / विद्यार्थीनी आणि सामाजिक कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करणार असून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घ्यावा असे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी केले आहे.
