मालवण (प्रतिनिधी)
शिवसेनेत आमदारांच्या बंडामुळे उलथापालथ झाली असली तरी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेशी आपली निष्ठा कायम ठेवत स्वाभिमान दाखविल्याने आज मालवणात दाखल झालेल्या आम. वैभव नाईक यांचे मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने जल्लोषी स्वागत करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, हमारा नेता कैसा हो… वैभव नाईक जैसा हो…, वैभव नाईक आगे बढो, हम तुम्हारे साथ है… शिवसेना झिंदाबाद… अशा घोषणा देत शिवसैनिकांनी देत आसमंत दणाणून सोडला.
आज सकाळपासून मालवणात पाऊस कोसळत असतानाही आम. वैभव नाईक यांच्या स्वागतास शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. आम. वैभव नाईक हे भरड नाका येथे दाखल झाले असता तालुकाप्रमुख हरी खोबरेलर व इतर पदाधिकारी यांच्याकडून आम. नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भगवे झेंडे फडकवत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ फलक झळकवत आणि ढोल ताशांच्या गजरात भरड नाका ते शिवसेना शाखा अशी रॅली काढण्यात आली.
यावेळी सोहळ्याला शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, पंकज सादये, नरेश हुले, भाई कासवकर, गणेश कुडाळकर, कमलाकर गावडे, आकांक्षा शिरपुटे, शीला गिरकर, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, निधी मुणगेकर, नंदिनी कुडाळकर, प्रतीक्षा कोरगावकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, शहर प्रमुख मंदार ओरसकर, अमेय देसाई, महिला उपसंघटक सेजल परब, महिला समन्वयक पुनम चव्हाण, सौ. शिल्पा खोत, प्रवीण लुडबे, आतु फर्नांडिस, नीनाक्षी शिंदे, सन्मेष परब, बाबा सावंत, किरण वाळके, गौरव वेर्लेकर, बाळू नाटेकर, उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, दीपक देसाई, भगवान लुडबे, सुहास वालावलकर, महेंद्र म्हाडगुत, नंदा सारंग, अंजना सामंत, पुजा तळाशीलकर, प्रसाद आडवणकर, सुरेश मडये, दत्ता पोईपकर, बंड्या सरमळकर, स्वप्निल आचरेकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेतून आमदार फुटत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसोबत कोण राहणार असे विचारले असता त्यावेळी पहिला पोहचणारा आमदार मी होतो. शिवसेनेतून आजपर्यंत जे फुटून गेले त्यांची अवस्था काय झाली हे सर्वानी बघितले आहे. आज जे आमदार फुटले त्यांनाही भविष्यात ते कळणार आहे. शिंदे विरुद्ध शिवसेना अशी ही लढाई नाही. ही लढाई मदमस्त झालेल्या भाजप विरोधात आहे. शिवसेना संपविण्याचा डाव आहे. शिवसेनेला संपविताना देशातील पक्ष संपले, मात्र शिवसेना कधी झुकली नाही. मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्याचे षडयंत्र चालू आहे. शिवसेने सारख्या छोट्या पक्षाविरोधात इतर पक्ष मोठी मोहीम घेऊन जातात. शिवसेना जखमी होते तेव्हा अधिक जोमाने काम करते, असेही आम. नाईक म्हणाले.
बंडखोर आमदारांच्या गटात सामील झालेल्या आम. दीपक केसरकर यांना शिवसेनेने काय नाही दिले. केसरकरांना मंत्री पद द्यावे अशी वरिष्ठांकडे मागणी करणारा मीच होतो, असेही यावेळी आम. नाईक म्हणाले. निधी मिळाला नाही असे आमदार सांगतात. मात्र आमदारांना निधी मिळण्यासाठी मीच मागणी केली. मार्च मध्ये झालेल्या अधिवेशनात शिवसेना आमदारांना जास्तीचा निधी देण्यात आला. फुटलेल्या आमदारांमधीलही काही आमदार फुटतील. मात्र त्यावेळी लोकांची त्यांच्याप्रति निष्ठा राहणार नाही. गद्दारीचा डाग पुसून जाणार नाही. आमिषे दाखवली जातील, आमदारकी, पदे मिळत राहतील, परंतु हे काही आयुष्यभर राहणार नाही, मात्र शिवसेनेवरील निष्ठा कायम राहील, आपण शिवसेनेवरील निष्ठेशी पाईक आहोत, असेही यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सांगत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचा पुनरुच्चार केला.
