पत्रकार निलेश मोरजकर आणि बांदा केंद्र शाळेचे शिक्षक जे.डी पाटील यांचा शिवराज्यभिषेक प्रतिमा देऊन सत्कार…

बांदा/प्रतिनिधी
देव, देश आणि धर्म यासाठी कार्यरत असणाऱ्या शिवशंभु प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात आणि मनामनात रुजवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा देऊन सन्मानीय व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने येथील ‘सकाळ’चे पत्रकार तथा सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे नियमित रक्तदाते निलेश मोरजकर व बांदा केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक जे डी पाटील यांचा शिवराज्याभिषेक प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. शिवशंभू प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जय भोसले यांच्याहस्ते ही प्रतिमा प्रदान करण्यात आली.
यावेळी निलेश मोरजकर यांनी शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेशचे कार्य अतिशय स्पृहणीय आहे. हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरात व मनात असणे आवश्यक आहे, नव्हे ती काळाची गरज आहे असे सांगत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष जय भोसले, उपाध्यक्ष तुषार देसाई, बांदा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, पतंजली योग समितीचे शेखर बांदेकर, विकी केरकर, संजय नाईक, चंद्रकांत कदम, स्वानंद पवार, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रशांत गवस, अक्षय मयेकर आदी उपस्थित होते.
जय भोसले म्हणाले कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक क्षेत्रात योगदान येणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा निर्णय आमच्या प्रतिष्ठानने घेतला आहे. बांद्यात नियमित रक्तदान करणारे तसेच आतापर्यंत सिंधुदुर्ग व गोव्यात शेकडो रुग्णांना तात्काळ रक्त उपलब्ध करून देणारे निलेश मोरजकर व बांदा केंद्रशाळेला आज विविध उपक्रमांच्या माध्यमातून पटसंख्येत जिल्ह्यात नंबर १ वर आणणारे उपक्रमशील शिक्षक जे डी पाटील यांचे कार्य हे कौतुकास्पद व आताच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

You cannot copy content of this page