भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम..

वेंगुर्ला, ता. २ : भविष्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच जलसंधारणाला गती देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारण्याच्या महाअभियानाचा शुभारंभ गुरुवारी वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे-गुरव टेंबवाडी येथे करण्यात आला.
युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शुभारंभप्रसंगी त्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून पहिल्या वनराई बंधाऱ्याच्या कामात सहभाग घेत अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी परिसरातील शेतीची पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेताच्या बांधावरच शेतकऱ्यांसोबत न्याहारी घेत त्यांनी आपुलकीचा संवाद साधला.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेवर आधारित या अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये टप्प्याटप्प्याने ५० वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढवणे आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
वाढदिवसाचा केवळ औपचारिक उत्सव न करता जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष कामात सहभागी झाल्याबद्दल विशाल परब यांच्या साधेपणाचे आणि उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
या शुभारंभ सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेटये, सदानंद गिरप, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, वेतोरे सरपंच प्राची नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव ऊर्फ बंड्या पाटील, माजी तालुकाध्यक्ष बाळा सावंत, शैलेश जामदार, समीर कुडाळकर, शक्तीकेंद्र प्रमुख सुधीर गावडे, बूथ अध्यक्ष विरोचन धुरी, दीपक करंगुटकर, आबा येरम, सूर्याजी नाईक, ग्रामपंचायत सदस्य विक्रम सावंत, ताता गावडे, एसटी प्रवासी संघटनेचे श्री. वेतोरकर, प्रशांत नाईक, राजेश सामंत, संतोष पेडणेकर, सुनील गडेकर, सुनील घाग यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, तरुण, भाजप कार्यकर्ते आणि जलसंधारण क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
