Headlines

‘अंगण का मिलन’ उपक्रमातून अंगणवाडी सेविकांचा सन्मान…

कणकवली तालुक्यातील विविध अंगणवाड्यांना भाजप शहर मंडलाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी…

⚡कणकवली ता.०२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात सेवा सप्ताह अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कणकवली शहर मंडलाच्या वतीने ‘अंगण का मिलन’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील विविध अंगणवाड्यांना भेटी देऊन अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करण्यात आला. अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करून त्यांच्यासोबत वेळ घालविण्यात आला. तसेच गरोदर व स्तनदा मातांशी संवाद साधण्यात आला. अंगणवाडी सेविका व मदतनीस या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे काम करतात. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचे संगोपन, त्यांना पोषण आहार देणे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे तसेच त्यांच्यावर संस्कार घडविण्याची जबाबदारी त्या पार पाडतात. गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार व आवश्यक मार्गदर्शन देण्यासोबतच मातृ वंदना, लाडकी बहीण आदी शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी वागदे आर्यादुर्गा, वागदे डंगळवाडी, ओसरगाव कानसळी, ओसरगाव खासकीलवाडी, बोर्डवे शाळा क्रमांक एक, श्री हनुमान मंदिर जाणवली अंगणवाडी शाळा, हुमरट शाळा क्रमांक एक, बेळणे शाळा क्रमांक एक आणि तिवरे खालचीवाडी येथील अंगणवाड्यांना भेटी देण्यात आल्या. यावेळी सेविका व मदतनीसांचा सन्मान करण्यात आला. मुलांना खाऊ वाटप करण्यात आला, तर गरोदर व स्तनदा मातांशी संवाद साधून त्यांच्या योजनांबाबत माहिती घेण्यात आली.

या उपक्रमावेळी ‘अंगण का मिलन’च्या संयोजिका मेघा अजय गांगण, भाजप कणकवली शहर मंडल तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शीतल दळवी, कळसुली जि. प. सदस्य, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, पंचायत समिती सदस्य माहेश्वरी चव्हाण, वंदना पारकर, सरपंच सुप्रिया कदम, सरपंच वेदांगी पाताडे, राहुल आंगणे, साक्षी वाळके, सुप्रिया चंद्रशेखर काणेकर, चंद्रशेखर काणेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page