१० ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट:कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारण मोहीम तीव्र..

⚡कुडाळ ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाणी साठवणूक आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. येत्या १० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी दिली.
कमी पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील कुळीथ, मूग आणि भुईमूग या पिकांच्या लागवडीसमोरही पाण्याचे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि जलसंधारणाला महत्त्व देत कृषी विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्रितपणे वनराई बंधारे उभारण्याची मोहीम सुरू केली आहे.
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहभागातून पोती व मातीचा वापर करून वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी, विहिरींची आणि भूजलाची पातळी टिकवून ठेवण्यासह आगामी हंगामातील पिकांसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक महिला शेतकरी उदया उल्हास धुरी यांनी व्यक्त केला.
या उपक्रमावेळी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे, कुडाळचे कृषी अधिकारी भास्कर चौगुले, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पिंगुळीचे सरपंच अजय केरकर, स्थानिक पोलीस पाटील, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील जलसाठे वाढवून आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी या मोहिमेच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत.
