राजू मसुरकर यांची मागणी : पालकमंत्री नितेश राणे यांचे वेधले लक्ष..

सावंतवाडी ता. २ : सावंतवाडी शहर तसेच माजगाव, मळगाव, चराठे, कोलगाव, केसरी आदी ग्रामीण भागातील भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी चराठा-कारिवडे सीमेवर मंजूर करण्यात आलेल्या धरणाचे काम तातडीने सुरू करून ते पूर्ण करावे, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सावंतवाडी शहर व ग्रामीण भागात जानेवारीपासूनच पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सावंतवाडी शहर व ग्रामीण भागाला कुणकेरी व केसरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या दोन्ही धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा कमी असल्याने आगामी काळात पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर चराठा-कारिवडे सीमेवर काही वर्षांपूर्वी नवीन धरणाला शासनाने मंजुरी दिली होती. या प्रकल्पासाठी जमीनमालकांना मोबदला देऊन धरणाचे काम तातडीने सुरू केल्यास पुढील काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे सावंतवाडी शहरासह परिसरातील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास मदत होईल. भविष्यात शहराला तसेच ग्रामीण भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे मसुरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या धरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व अर्थ विभागामार्फत विशेष निधीची तरतूद करून प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी राजेंद्र मसुरकर यांनी केली आहे.
