मालवण काँग्रेसने दिली नगर पालिकेवर धडक

शहरातील मैला कोळंब खाडीत सोडत असल्याचा केला आरोप:आंदोलनाचाही दिला इशारा

मालवण (प्रतिनिधी)

मालवण मधील कॉम्प्लेक्स मधील सांडपाणी, कचरा आदी समस्यांसह शहरातील शौचालयांमधील मैला नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून कोळंब खाडीत सोडला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज मालवण नगरपालिकेत धडक देत आरोग्य निरीक्षकांना धारेवर धरले. मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकाराचा खुलासा करावा अन्यथा काँग्रेसला ऍक्शन मोड मध्ये येऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देत याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांचेही लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.

यावेळी काँग्रेसचे महेश अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, जेम्स फर्नांडिस, संदेश कोयंडे, पल्लवी तारी, बाबा मेंडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, गणेश पाडगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोग्य निरीक्षक प्रसाद भुते यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. शहरातील शौचालयांमधून गोळा केलेला मैला नगरपालिका कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कोळंब खाडीत सोडत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करत या प्रकारामुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. शहरातील काही कॉम्प्लेक्स मधील सांडपाणी हे उघड्यावर सोडले जात आहे. यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्सची पाहणी देखील अधिकाऱ्यांनी करावी. शहरातील स्वच्छता व आरोग्य विषयक प्रश्न सोडविण्यास मुख्याधिकारी सक्षम नाहीत. स्वच्छ मालवण सुंदर मालवण असे फलक केवळ नावापुरते लावले आहेत. प्रत्यक्षात तशी कोणतीही कार्यवाही न. प. प्रशासनाकडून होत नाही, असे आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकारी महेश अंधारी, संदेश कोयंडे यांनी केले.

मैला खाडीत टाकण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. हे प्रश्न न सुटल्यास काँग्रेसला ऍक्शन मध्ये येऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा देत याप्रश्नी जिल्हाधिकारी यांचेही लक्ष वेधणार आहोत, असे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page