२० लाखांची पकडलेली दारूची जागा सेनेच्या माजी नगरसेवकाची

सेनेचे वरिष्ठ तुषार सापळे यांना वाचविण्याच्या प्रयत्नांत:जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा आरोप

वेंगुर्ले:
वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात दोन दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर येथील पथकाने २० लाख रुपयांचा बेकायदा गोवा बनावटी दारू साठा जप्त केला होता. ती जागा वेंगुर्ले शहरातील दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी तुषार सापळे यांची असून ते यामागचे मुख्य सूत्रधार आहेत. व त्यांना वाचवण्यासाठी शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची खटपट सुरू असल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला आहे.


येथील भाजपच्या तालुका कार्यालयात मनिष दळवी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना श्री दळवी म्हणाले की, होडावडा येथे ज्या ठिकाणी बेकायदा गोवा बनावटी दारूचा साठा जप्त करण्यात आला त्या जागेचा मालक शिवसेनेचे पदाधिकारी व २ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले तुषार सापळे आहेत. त्याठिकाणी ते काजू प्रक्रिया युनिट चालवतात. तसेच त्याठिकाणी त्यांची रोज ये – जा सुरू असते. दरम्यान याठिकाणी धाड पडल्यानंतर ते गोडाऊन भाड्याने दिल्याचे सांगितले गेले ही माहिती पूर्णतः खोटी आहे.


होडावडा ग्रामपंचायतवर शिवसेनेचे सत्ता असल्याने सत्तेचा गैरवापर करून त्याठिकाणचे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या संगनमताने या काजू फॅक्टरी युनिटचे अनधिकृत बांधकाम केले गेले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर पथकाकडून केलेली कारवाई ही संशयास्पद आहे. याची चौकशी वरीष्ठ पातळीवर झाली पाहिजे. या प्रकरणात तुषार सापळे यांचे नाव येऊ नये म्हणून जिल्ह्यातील कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने कोल्हापूरच्या कोणत्या नेत्याला फोन करून सेटिंग लावली याची माहिती माझ्याकडे आहे. यामुळे मुख्य आरोपी म्हणून तुषार सापळे यांच्यावर कारवाई केली पाहिजे असेही दळवी म्हणाले
तसेच याबाबत स्थानिक पोलीस यंत्रणेला माहिती नसणे हे इथल्या स्थानिक पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. या भागातून मोठ्या प्रमाणतून दारूची रासरोजपणे तस्करी केली जाते . तुषार सापळे यांच्या जागेमध्ये दारूचा साठा केला जात होता हे आज कित्येक महिने सुरू असल्याची माहिती आता समोर येतेय. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी सावंतवाडी मध्ये कोठावळे नामक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला दारू वाहतूक करताना पकडले होते. व आता वेंगुर्लेमध्येही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या जागेमध्ये मोठा दारू साठा सापडला आहे. यामुळे शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग करून हे बेकायदा व्यवसाय केले जात आहेत. असा आरोपही यावेळी श्री दळवी यांनी केला.


दरम्यान याबाबत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तुषार सापळे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास अधिक तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी श्री दळवी यांनी दिला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी जि प सदस्य प्रितेश राऊळ, माजी नगरसेविका शीतल अंगाचेकर, कृपा गिरप- मोंडकर, बाबली वायंगणकर, ज्ञानेश्वर केळजी, नितीन चव्हाण, दादा केळुसकर, वसंत तांडेल आदी उपस्थित होते.

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना मनिष दळवी

You cannot copy content of this page