जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या बैठकीत एकमुखी निर्णय
ओरोस ता.१५-:
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीचे ज्येष्ठ सदस्य दिलीप उर्फ बाळ खडपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुख्यालय पत्रकार संघाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमुखी घेण्यात आला.
जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार लक्षात समिती अध्यक्ष संजय वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी संपन्न झाली. या बैठकीला समिती सदस्य तथा जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा सहसचिव देवयानी वरसकर, जिल्हा सदस्य बाळ खडपकर, उपाध्यक्ष लवू म्हाडेश्र्वर, सहसचिव सतीश हरमलकर, खजिनदार दत्तप्रसाद वालावलकर, सदस्य संदीप गावडे, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, गिरीश परब, विनोद परब, तेजस्वी काळसेकर आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष वालावलकर यांनी जिल्हा कार्यकारणी सदस्य पदासाठी एक सदस्य निवड करून त्याचे नाव कळविण्याचे आवाहन जिल्हा पत्रकार संघ व निवडणूक अधिकारी यांनी केले असल्याचे सांगितले. त्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे वालावलकर म्हणाले.
यावेळी जिल्हा कार्यकारिणीवर जाण्यास कोण इच्छुक असल्यास सांगण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी खडपकर यांनी आपण जिल्हा कार्यकारिणीवर जाण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर कोणीही इच्छा व्यक्त n केल्याने खडपकर यांची निवड बिनविरोध झाली. यावेळी खडपकर यांनी मुख्यालय पत्रकार समितीच्या सदस्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सतत प्रयत्न करीन, असा विश्वास व्यक्त केला. निवडीनंतर सर्व सदस्यांनी खडपकर यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
