सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तांबे यांचे निधन

कणकवली ता.०६-:* महाराष्ट्र राज्य राखीव दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गोपाळ तांबे ( वय 46, मूळ रा. शिवडाव , सध्या रा. जळकेवाडी, कणकवली ) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान नुकतेच दुःखद निधन झाले.

प्रकाश तांबे यांनी 19 वर्षे एसआरपीएफ मधील सेवा काळात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातही सेवा बजावली होती. सध्या ते वानवडी पुणे येथे एसआरपीएफमध्ये कार्यरत होते. कणकवली कॉलेज चे माजी विद्यार्थी असलेल्या प्रकाश तांबे यांनी महाविद्यालयीन काळात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून काम केले होते.

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आणि अकारण आकारण्यात आलेले प्रवेश शुल्क पुन्हा मिळवून देण्यात त्यांचा सहभाग होता. कणकवली येथील दर्पण सांस्कृतिक मंच चा क्रियाशील कार्यकर्ता म्हणूनही प्रकाश यांनी काम केले होते.

आरोंदा हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांचे ते कनिष्ठ बंधू होत. प्रकाश यांचा मित्रपरिवार मोठा होता. मैत्रीला जागणारा आणि मित्रांना जगवणाऱ्या प्रकाशच्या अकाली मृत्यूने त्याच्या मित्रपरिवार, नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय इतमामात पुणे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चत पत्नी, एक मुलगी, भाऊ, वहिनी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page