टोल सुरू झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल:परशुराम उपरकर
कणकवली ता.०६-:* चौपदरीकरणाच्या कामात जनतेसोबत असल्याचे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी, सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराची बाजू घेत जनतेला फसवले. त्यातीलच एक लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना लढायला लावून आपण मात्र टोल कंपनीच्या मॅनेजर सोबत बैठक घेतल्याची विश्वासनीय माहिती आहे.
टोलचे काम आपणाला द्या आपण सारे मॅनेज करतो असे सांगत या लोकप्रतिनिधीने येथील जनतेचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती असून मनसे सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना माफी व अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत तोवर टोल विरोधात मनसे ठामपणे रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे. एकीकडे टोलवसुली विरोधात आंदोलने सुरू असताना जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीने टोलवसुली कंपनीच्या मॅनेजर सोबत चार-पाच दिवसापूर्वी मुंबईत बैठक केल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रस्तराचा वापर करून ही बैठक घेत टोल वसुलीची जबाबदारी आपल्याकडे देण्यास या लोकप्रतिनिधीने सांगितल्याचे समजते.
आपल्याकडे जबाबदारी दिल्यास सारा विरोध आपण मावळून काढू असे या लोकप्रतिनिधीने सांगताना एकीकडे जिल्ह्यात टोलविरोधी असल्याचे दाखवून दुसरीकडे टोलची जबाबदारी घेण्याची तयारी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे खात्रीलायक समजते. टोल वसुलीबाबत मनसेने सुरुवातीपासूनच जनतेची बाजू घेत टोल वसुलीला सक्त विरोध केला आहे. टोलवसुलीची ट्रायल मनसेने पहिल्याच दिवशी बंद पडली.
त्यानंतर जिल्ह्यातील अन्य काही राजकीय पक्षांनीही टोलविरोधी आंदोलने केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एम एच 07 पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी मिळायलाच हवी. तसेच जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, लोकांना मोबदला दिला जात नाही तोपर्यंत टोलवसुली केल्यास मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, ही आमची भूमिका आहे. मात्र सिंधुदुर्गात टोल वसुली सुरू केली जाणार नाही, प्रसंगी आंदोलने करू अशी भूमिका घेत असलेल्या एका पक्षाच्या लोकप्रतिनिधीने मुंबईत हैदराबादच्या या टोल कंपनीच्या अधिकार्यांशी बैठक केली.
केंद्र स्तरावरील ताकदीचा वापर करत या लोकप्रतिनिधीने ही बैठक केल्याचे समजते. एकीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनाची नौटंकी करायची आणि दुसरीकडे स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्ह्यातील जनतेशी प्रतारणा करण्याचा हा प्रकार म्हणजे ….टाळुवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. आम्हाला याबाबत खात्रीशीर व पूर्ण माहिती मिळाली असून जिल्हा वासियांच्या माथी अशा प्रकारची टोलवसुली आम्ही कधीही लागू देणार नाही. त्यासाठी मनसे रस्त्यावर उतरून जे काही करावे लागेल ते सर्वकाही करण्यास तयार आहे असा इशाराही श्री. उपरकर यांनी दिला आहे.
