वेंगुर्ला प्रतिनिधी– अथांग सागराच्या उसळणा-या समोर लाटा, उन्हात चमचम करणारी पांढरी शुभ्र वाळू आणि झुळझुळणारा वारा अशा जादूई निसर्गाच्या सान्निध्यात वायंगणी येथील डॉ. किर्लोस्कर बंगल्यात चिंत्र्यं खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या साहित्यावर ‘गाज‘ हा विविधरंगी कार्यक्रम रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झाला.
वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने आरती प्रभूंच्या साहित्यावर ‘गाज‘ नावाचा विविधरंगी कार्यक्रम आयोजित केला होता. यात गीत गायन, काव्यवाचन, नाट्यउतारा सादरीकरण, अभिवाचन, भाषण अशा विविधप्रकारे सादरीकरणातून चिंत्र्यं खानोलकरांचे स्मरण करण्यात आले. प्रा.सचिन परुळकर यांनी प्रास्ताविक केले.
आनंदयात्रीच्या संचालिका लेखिका वृंदा कांबळी यांनी कार्यक्रमाचे अभिनव स्वरूप विषद केले. अवधूत नाईक, देवयानी आजगावकर , राकेश वराडकर, महेश बोवलेकर व सुप्रसिद्ध गायक शैलेश जामदार यांनी विविध गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली. प्रा.मृण्मयी बांदेकर-पोकळे, राजश्री परब, पि.के.कुबल, पूजा बोवलेकर, योगेश कुळकर्णी, रसिका तेंडोलकर, प्रितम ओगले, डॉ. संजीव लिंगवत, श्रीहर्षा टेंगशे आदींनी कविता सादर केल्या. नाट्यलेखक व दिग्दर्शक प्रसाद खानोलकर यांनी ‘कालाय तस्मैनमः‘ या नाटकातील उतारा सादर केला. शशांक मराठे व सीमा मराठे यांनी खानोलकरांवरील निबंधातील उता-र्यांचे अभिवाचन केले. डॉ. दीपाली किजरेकर यांनी आपल्या मनोगतात चिंत्र्यं खानोलकरांच्या एकूण साहित्य प्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला. नाट्य दिग्दर्शक संजय पुनाळेकर यांनी चिंत्र्यं खानोलकरांच्या जीवनातील काही घटना खुमासदार शैलीत कथन केल्या. आपल्या ओघवत्या भाषेतील निवेदनाने पूजा बोवलेकर यांनी कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेले.
डॉ. नामदेव मोरे, डॉ. वसुधा मोरे, अॅड. चैतन्य दळवी , चारूशीला दळवी, रमेश पिंगुळकर, रेश्मा पिंगुळकर, श्रीमती बांदेकर, स्मिता नाबर, येरागी गुरूजी, पेडणेकर गुरूजी, वासूदेव पेडणेकर, ज्ञानेश करंगूटकर, महेश राऊळ, संजय पाटील, सॅम्युएल काळे इत्यादी साहित्यप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कीर्तनकार अवधूत नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.
