जनवादी संमेलनाच्या चर्चासत्रात डॉ.राजन गवस यांचा सवाल
सावंतवाडी ता.०९-:* महापुरुषांनी आपल्याला वैचारिक बैठक दिली आहे. या वैचारिक बैठकीनुसार काळानुरूप नवनिर्माण साहित्य निर्मिती होणे गरजेचे आहे. ती आपली जबाबदारी आपण विसरलो आहोत का.. ?असा प्रश्न आजच्या मराठी साहित्यातील दलित आदिवासी ग्रामीण शहरी कष्टकरी स्त्री-पुरुषांचे जीवन दर्शन या विषयाची मांडणी करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी उपस्थित केला. जनवादी साहित्य संस्कृती संमेलन येथील आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर गुरुवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलननगरीत सुरू आहे. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘आजच्या मराठी साहित्यातील दलित आदिवासी ग्रामीण शहरी कष्टकरी स्त्री पुरुषांचे जीवनदर्शन’ या विषयाची मांडणी करताना डॉ.राजन गवस बोलत होते.
यावेळी वक्ते महेंद्र कदम, डॉ.नारायण भोसले, दत्ता घोलप, प्रा.डॉ.सोमनाथ कदम, प्रा.डॉ.सुनील भिसे, संपत देसाई, अंकुश कदम आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्र कदम, डॉ.नारायण भोसले, दत्ता घोलप, प्रा.डॉ.सोमनाथ कदम यांनी या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. या पार्श्वभूमीवर बोलताना राजन गवस म्हणाले, महाराष्ट्र अठरापगड जाती जमातीमधील लोकांनी मिळून आहे. पण नवनिर्माण साहित्य निर्मिती करताना अठरापगड जाती जमातीमधील मुलत्त्वे, परंपरा आणि त्या आधारावरील साहित्य दर्शन घडायला हवे. आपण शिकलेले असलो तरी संवेदना गमावून बसलो आहोत. भ्रद्र लोकांचे आचरण करत गेलो. त्यामुळे संवेदना हरवून गेलो आहोत.
तळागाळातील माणसांचे नातेसंबंध आणि त्यांच्या परंपरा आधारावर आपण साहित्य निर्मिती करायला हवी. राजन गवस पुढे म्हणाले,आपल्या महापुरुषांनी त्यांच्या काळातील साहित्य आधारावर आपल्यासाठी बैठक निर्माण केली आहे. ती आपण उगाळत बसलो आहोत. ती उगाळायला हवी. मात्र आपला समाज आता पुढे सरकत आहे. त्यामुळे अठरापगड जातीतील चित्र साहित्यात आले पाहिजे. प्रत्येकाने काळानुरूप वैचारिक बैठक निश्चित करून ते साहित्य दर्शन घडवायला हवे. समाजाच्या पोटात जात आहे.
समाजाचा अभ्यास करणाऱ्यांनी त्याची मांडणी केली पाहिजे. महापुरुषांनी वैचारिक बैठक निश्चित केली आहे त्या आधारावर केली पाहिजे , ही आपली जबाबदारी आपण विसरायला नको. प्रा.डॉ.सोमनाथ कदम यांनी प्रास्ताविक केले तर दत्ता घोलप यांनी शेतकरी स्त्रीचा आवाज साहित्यात दिसायला हवा. शेती जीवनातील स्त्रीचे साहित्य दर्शन व्हायला हवे असे सांगितले.नारायण भोसले यांनी भटका विमुक्त लोकांमध्ये आजही ८० ते ९० टक्के लोकांना शेत जमीन व घर नाही असे सांगून या लोकांचे साहित्य रूपाने दर्शन व्हायला हवे असे स्पष्ट केले तर महेंद्र कदम यांनी या विषयाचा आधारे विवेचन केले. यावेळी संमेलन आयोजक अध्यक्ष संपत देसाई, कार्याध्यक्ष प्रतिभा चव्हाण, सेक्रेटरी अंकुश कदम, उपसचिव प्रा. रुपेश पाटील, कवी विठ्ठल कदम, पत्रकार मोहन जाधव, प्रज्ञा मातोंडकर, प्रा.प्रवीण बांदेकर, अँड.संदीप निंबाळकर,चंद्रकांत जाधव, कवी अजय कांडर ,पराग गावकर, मिलिंद माटे तसेच मान्यवर उपस्थित होते.
