पाडलोसमध्ये मोरीपुलाला पडले मोठाले भगदाड

बांदा ता.२२-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस-स्मशानभूमी रस्त्याजवळ असलेल्या मोरीपुलाला सुमारे सहा फुटी भगदाड पडले असून अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा धोकादायक मोरीपुलांना भगदाड पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

पाडलोस-स्मशानभूमी रस्त्याजवळ जुने मोरीपुल असून सद्यस्थितीत धोकादायक बनले आहे. भगदाड पडून आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी सुद्धा झोपी गेलेल्या संबंधित विभागाला जाग येत नसल्याच्या संतप्त भावना सर्वस्तरातून व्यक्त होत आहेत. बांदा-शिरोडा मार्गावर रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना नवख्या वाहनचालकाला भगदाड दृष्टीस न पडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही हानी होण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी, नागरिकांमधून होत आहे.

You cannot copy content of this page