*⚡बांदा ता.२२-:* पाडलोसमध्ये सुरू असलेल्या पाईपलाईन खोदाई कामात चक्क मोरीपुलच गायब झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून रस्ता उखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या बेपर्वाइमुळेच असे प्रकार होत असून यास संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जर मोरीपुलावर पडलेली माती न हटविल्यास डोंगरावरील सर्व पाणी रस्त्यावर येणार अन भविष्यात नैसर्गिक आपत्तीस आम्हाला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगत प्रशासनावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
पावसाळा तोंडावर असल्याने पाईपलाईन खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु याकडे संबंधित ठेकेदाराचे पुर्णतः दुर्लक्षच असल्याचे स्पष्ट होत आहे. खोदाईपूर्वी दिसत असलेले मोरीपुल सद्यस्थितीत गायब आहे. त्यावर माती पडल्याने पूर्णपणे बुजलेले आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे लक्ष नसून याला कोणीही वाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रशासनाने सदर घटनेची तात्काळ दखल घेत मोरीपुलावरील माती हटवून मार्ग वाहतुकीसाठी निर्धोक करावा व कार्यालयात बसून देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी पूर्ण मार्गाची पाहणी करावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
