विविध योजनांतून मिळणार अनुदानाचा लाभ..
⚡सिंधुदुर्गनगरी ता १७-:
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील सुमारे १० ते १२ हजार शेतकऱ्यांना दिला जाणार असून योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठी तालुकास्तरावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती पशुसंवर्धन समिती सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी आजच्या पशुसंवर्धन समिती सभेत दिली.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीची सभा सभापती दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर बिलोलीकर, समिती सदस्य गणेश राणे, स्वेता धर्ने, रामा गवस, संतोष पारकर ,शितल दळवी ,गंगाराम सडवेलकर आदींसह खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला सन २०२६- २७ साठी १ कोटी ९७ लाख ४१ हजार ३०० रुपये निधी प्राप्त असून या निधीतून विविध योजना राबविण्यात येत आहेत. याबाबत आजच्या सभेत माहिती दिली. काही योजनांमध्ये सदस्यांच्या सूचनेनुसार बदल करण्यात आले असून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनाच्या निधी खर्चास आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या बजेटमध्ये ८० लाख रुपये निधीची वाढ झाली असून सर्व योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा १८ ते ६५ वयोगटातील लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार असून योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थीने १ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपले मागणी प्रस्ताव सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावयाचे आहेत. अशी माहिती सभेत देण्यात आली.
पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा परिषद वाढीव उपकरा व्यतिरिक्त अनुदानातून राविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये दारिद्र्यरेषेखालील किंवा अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर पाच शेळ्या व एक बोकड यांचा गट पुरवठा करणे, या योजनेसाठी ४१ लाख ५२ हजार ८०० रुपये तरतूद असून यातून १३७ लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही यापूर्वी लाभ न घेतलेल्या लाभार्थीना ७५ टक्के अनुदानावर विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा करणे, या योजनेसाठी ६ लाख १२ हजार ५०० रुपये निधीची तरतूद असून या योजनेचा ४८ लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही नोंदणीकृत (यापूर्वी लाभ न घेतलेल्या )संस्थेला ९० टक्के अनुदानावर फॅट टेस्टिंग मशीन चा पुरवठा करणे, या योजनेसाठी ३ लाख २४ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील ८ लाभार्थी संस्थांना लाभ दिला जाणार आहे.
दारिद्र्यरेषेखालील किंवा अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी महिलांच्या सबलीकरणासाठी ७५ टक्के अनुदानावर पाच शेळ्या व एक बोकड यांचा गट पुरवणे, या योजनेसाठी ३० लाख २६ हजार ४०० रुपये निधीची तरतूद असून १०० लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पशुपालकांना ४० टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे, या योजनेसाठी ६० लाख रुपये निधीची तरतूद असून जिल्ह्यातील ८० लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे.
महिला सबलीकरणासाठी ९० टक्के अनुदानावर सुधारित जातीच्या आठ आठवडे वयाच्या २५ तलंगा व तीन नर कोंबडे यांचा पुरवठा करणे ,या योजनेसाठी ११ लाख २५ हजार रुपये निधीची तरतूद असून या योजनेचा १७५ लाभार्थीना लाभ दिला जाणार आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये विशेष घटक योजनेमधून अनुसूचित जाती/ नवबौद्ध लाभार्थींकडील दुधाळ जनावरांना शंभर टक्के अनुदानावर खाद्य पुरवठा करणे, या योजनेसाठी ५ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे तर १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप योजना, यासाठी ४५ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे.
संकरित/ देशी गोवंशीय कालवडी व सुधारित देशी म्हशींच्या पारड्यांची जोपासना करण्यासाठी ५० टक्के अर्थसहाय्य देणे, या योजनेसाठी ५ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.
७५ टक्के अनुदानावर अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दोन दुभत्या जनावरांचा गट वाटप करणे, यासाठी ५ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशाप्रकारे विविध योजनांसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील सुमारे १० ते १२ हजार लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीनी योजनांचे निकष व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी लाभार्थीने योजनांबाबतची आवश्यक ती माहिती व निकष जाणून घेऊन आपले प्रस्ताव वेळेस सादर करणे आवश्यक असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
