Headlines

दवाखाने जीर्ण, खुर्च्या कशाला…?

रामा गवस यांचा पशुसंवर्धन समिती सभेत संताप..

⚡सिंधुदुर्गनगरी ता १७-:
गतवर्षी जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेला परंतु अखर्चित राहिलेला निधी पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील खुर्च्या व अन्य फर्निचर खरेदीसाठी खर्च करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. मात्र, “दवाखाना पडायला आला आहे, खुर्च्या कशाला वाटताय? आधी दवाखान्यांची डागडुजी करा,” असा सवाल उपस्थित करत सदस्य रामा गवस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची मासिक सभा सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली. यावेळी समिती सचिव तथा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बिलोलीकर, सदस्य गणेश राणे, संतोष पारकर, शितल दळवी, रामा गवस तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गतवर्षीचा सुमारे १५ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने तो चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यास सभागृहाची मंजुरी घेण्यात आली. या निधीतून पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी फर्निचर खरेदी करण्याचा प्रस्ताव सभापती दादा साईल यांनी मांडला. दवाखान्याबाहेर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याची सूचनाही अधिकाऱ्यांनी केली.
यावेळी सदस्य रामा गवस यांनी हस्तक्षेप करत उसप येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अत्यंत जीर्ण असून इमारत पडण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. इतर बाबींवर खर्च करण्यापूर्वी दवाखान्यांच्या दुरुस्ती व देखभालीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, अखर्चित निधीचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्याच्या दृष्टीने २० काऊ लिफ्टर खरेदी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. हे काऊ लिफ्टर शेतकऱ्यांना मोफत वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, १० दिवसांच्या कालावधीसाठी एक हजार रुपयांची अनामत रक्कम घेतली जाईल. काऊ लिफ्टर परत केल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना परत देण्यात येणार आहे.
सभेत सदस्य तथा देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे यांनीही शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांतील डॉक्टर उपचारासाठी शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर अनेकदा अशी औषधे लिहून देतात, जी शासकीय दवाखान्यांत उपलब्ध नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी औषधे खरेदी करताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, असे त्यांनी सांगितले.
एकीकडे पशुधनाची संख्या झपाट्याने कमी होत असताना अशा प्रकारांमुळे शेतकरी पशुपालनापासून दूर जातील, अशी खंतही राणे यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page