Headlines

अल निनोच्या संकटावर मात करण्यासाठी कृषीदिनी पाणी पुनर्भरणाचा संकल्प…

सिंधुदुर्गात भविष्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता; विंधन विहिरी, विहिरींमध्ये जलसाठा वाढविण्यावर कृषी समितीचा भर..

ओरोस ता १७
अल निनोमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा दुष्काळ पसरण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे यावर्षी होणारा १ जुलै रोजीचा कृषीदीन विंधन विहिरी, विहिरीमध्ये पाणी पुनर्भरण कार्यक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या कृषी समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. काही वर्षांपूर्वी विंधन विहिरीला ४० फुटावर पाणी मिळत होते. आता सरासरी ३५० ते ४०० फूट खोल गेल्यावर विंधन विहिरीला पाणी मिळते. अल निनोमुळे राज्यातील अन्य भागांप्रमाणे ७०० ते ८०० फूट खोल गेल्यावर पाणी मिळू शकते. त्यामुळे यावर्षी जमिनीच्या गर्भाशयातील पाणी पातळी वाढविण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची जून २०२६ या महिन्याची मासिक सभा सभापती तुकाराम साईल यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष दालनात बुधवारी दुपारी संपन्न झाली. यावेळी सभा सचिव तथा जिल्हा कृषी अधिकारी दिशांत कोळप, सदस्य संदीप गावडे, शंकर घारे, अक्षता गावडे, सुयोगी घाडी, पार्वती गवस, सुजाता पडवळ, डायगो डिसोझा, विजय नाईक, विक्रांत गावडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी १ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमाच्या नियोजनाच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत अल निनोमुळे शेती पिकावर तसेच भविष्यातील पाणी साठ्यावर होणाऱ्या दुष्परिणामावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरवर्षी आपल्याकडे हजारो मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी किती पाऊस पडेल ? हे सांगता येणार नाही. त्यामुळे कृषीदीन साजरा करताना संभाव्य पाणी पातळी खालावण्यावर उपाययोजना करण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी संदीप गावडे यांनी केली. जो काय पाऊस पडेल ते पाणी वाहून वाया न जाता ते विंधन विहिरी, कोरड्या पडलेल्या विहिरी यामध्ये सोडून तेथे पाण्याचे पुनर्भरण करण्याची मागणीही गावडे यांनी केली.
त्यानुसार कृषीदिनी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे पाणी पुनर्भरण कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. ज्या गावात असा प्रयत्न करण्यास संधी आहे, तेथे कृषीदीन घेण्याचे निश्चित करण्यात आले. एखाद दुसरा कार्यक्रम कमी झालातरी चालेल, पण आपल्या कार्यक्रमाचा उद्देश साध्य झाला पाहिजे, असे आदेश सभाध्यक्ष साईल यांनी प्रशासनाला दिले. यावेळी डिसोझा यांनी, शेतकऱ्यांनी भात बियाणे पेरले आहे. परंतु ते उगवलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारोंनी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आपल्या कृषी समितीकडून आर्थिक अथवा वस्तू रुपात मदत पोहोचली पाहिजे, या प्रमाणे नियोजन करण्याची मागणी केली.

You cannot copy content of this page