Headlines

मालवणकरांची प्रतीक्षा संपली! शहरात पहिलावहिला सीएनजी पंप सुरू…

⚡मालवण ता.१७-:
मालवण शहरातील ‘श्रीनिवास ऑटो सेंटर’ पेट्रोल पंपावर भारत पेट्रोलियम आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित सीएनजी पंपाचा शुभारंभ काल दिमाखात करण्यात आला. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक सरदार पडवळ यांच्या हस्ते या पंपाचे उद्घाटन करण्यात आले.
शहरासह तालुक्यात सीएनजी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, शहरात स्थानिक पातळीवर एकही सीएनजी पंप नसल्याने वाहनचालकांना, विशेषतः रिक्षा व्यावसायिकांना गॅस भरण्यासाठी ओरोस किंवा कुडाळ गाठावे लागत होते. यात त्यांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालवणातील सीएनजी धारक आणि रिक्षा व्यावसायिकांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन मालवणात सीएनजी पंप सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती.
आमदार निलेश राणे यांनी या मागणीची दखल घेत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर शहरातील ‘श्रीनिवास ऑटो सेंटर’ येथे ही सीएनजी सुविधा प्रत्यक्षात अवतरली आहे. या सुविधेमुळे स्थानिक रिक्षा व्यावसायिक, खासगी वाहनधारक तसेच मालवणात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची मोठी सोय होणार आहे. शहरातच सीएनजी उपलब्ध झाल्याबद्दल रिक्षा व्यावसायिक निलेश लुडबे व अन्य वाहनचालकांनी प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

या शुभारंभ प्रसंगी भारत पेट्रोलियम अधिकारी रुपाली बर्वे, सेल्स ऑफिसर अरविंद सिंग, इंजिनियरिंग ऑफिसर आकाश श्रीवास्तव, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापक आकाश शिंदे, दत्तात्रय शिरसाठ, राहुल कुलपे, सहाय्यक व्यवस्थापक दिव्यांशू.
श्रीनिवास ऑटो सेंटरचे व्यवस्थापक रवी मालवणकर, आनंद वराडकर, मंदार गावकर, राहुल वीर, तेजस राणे, महादेव चव्हाण, राकेश बगाड, अमित खांदारे, अश्विन गावकर, रोहन चव्हाण आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला मालवण परिसरातील सीएनजी धारक, रिक्षा व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालवणात सीएनजी सुरू झाल्याने वाहतूक क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.

फोटो

मालवणात श्रीनिवास ऑटो सेंटर पेंट्रोलपंप येथे सीएनजी पपंचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

You cannot copy content of this page