मालवण तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतीवर भाजपचाच झेंडा फडकणार

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास

मालवण दि-: गेली दहा वर्षे आमदार , खासदार हे शिवसेनेचे असताना मालवण तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गावागावातील वाडी वस्त्यांवर जाणारे रस्ते खड्डेमय बनल्याने आजारी व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी या रस्त्यावरून न्यायचे झाल्यास पालखी किंवा डोली यांचा वापर करावा लागणार आहे. रस्त्यांची अशी भयावह परिस्थिती व्हायला आमदार खासदार जबाबदार आहेत. बेरोजगारीचा प्रश्न जटील बनला आहे. राज्यात शिवसेनेचे सरकार असताना युवकांच्या हाताना हे सरकार काम देऊ शकत नाही राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति गुंठा शंभर रुपये नुकसान भरपाई म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे.एकूणच गेल्या आठ दिवसांत प्रचाराच्या निमित्ताने गावोगाव फिरताना राज्य सरकार आणि इथले आमदार, खासदार विरोधी रोष जनतेत दिसून येत असल्याने ग्रामपंचायत निवडणूकित शिवसेनेला त्याची फळे भोगावी लागतील . मालवण तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी येथे बोलताना व्यक्त केला. मालवण तालुक्यातील कुणकावळे, मसदे-चुनवरे, गोळवण-कुमामे, खरारे-पेंडूर, अडवली-मालडी, चिंदर या ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप मालवण तालुकाध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर यांनी या गावांना भेट देऊन केंद्रातील भाजप सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देत ग्राम पातळीवर भाजपची आवश्यकता का आहे याची माहिती विशद केली. ही माहिती देतानाच त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर आणि आमदार खासदारांच्या अकार्यक्षमतेवर झोड उठवली. यावेळी बोलताना श्री. धोंडी चिंदरकर म्हणाले, मालवण तालुक्यात सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असून भाजपकडे तीन तर शिवसेनेकडे तीन ग्रामपंचायती आहेत. मालवण मतदार संघात आमदारकीची दोन टर्म वैभव नाईक भोगत असताना या भागात विकासाच्या नावाने मात्र शिमगाच आहेत. तालुक्यात जाणारे हमरस्ते आहेत ते सोडाच पण ग्रामीण भागात अंतर्गत जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. रस्त्यांवर खड्यांचे जाळे पसरले आहे. आरोग्याच्या सोयीसुविधांचा अभाव आहे. ग्रामपंचायत स्थरावर जे सरकार दिवा बत्तीसाठी निधी देऊ शकत नाही किंवा पायाभूत सुविधा पुरु शकत नाहीत त्या सरकारचे आमदार, खासदार आज मतांसाठी दारोदार फिरत आहेत. खासदार, आमदार या निवडणुकीच्या प्रचारासाठी गावोगाव फिरत आहेत ही परिस्थिती त्यांच्यावर का आली याचे आत्मपरीक्षण करावे. खासदार विनायक राऊत तर गावभेटीच्या नावाखाली संबंधित गावात जाऊन शिवसेना उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तरी खासदार ,आमदारांचे लोकांना गावोगाव दर्शन होत आहेत. अशी टिकाही श्री. चिंदरकर यांनी केली. सिंधुदुर्गात ग्रामपंचायतीची निवडणूक ही भाजपा नेते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली जरूर लढवली जात आहे परंतु आम्ही पदाधिकारीच मालवण तालुक्यात प्रचार करीत आहोत मालवण तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल कारण मालवण तालुक्यात किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप पक्ष एकसंघ आहे. आमच्या पक्षात गटबाजीला थारा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या धोरणाला इथल्या लोकांनी पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळू लागला आहे. केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना राबविली जात आहे. पीक विमा योजनेचाही फायदा मिळू लागला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत जनता भाजपवर मत पेटीतून विश्वास व्यक्त करतील असेही चिंदरकर म्हणाले.

You cannot copy content of this page