पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरुपी डॉक्टर देणार

स्थानिक ग्रामस्थांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले लेखी आश्वासन

*💫मालवण दि.१३-:* पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या कमतरते बरोबरच इतर अनेक समस्या उद्भवल्या असताना पेंडूर रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी अचानक हजेरी लावत सर्व अधिकारी वर्गासमोर पेंडूर रुग्णालयाच्या समस्यांचा पाढा वाचला. तसेच आपल्याला या रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा अशी मागणी करत ठोस उत्तर मिळाल्याशिवाय येथून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एच. चव्हाण यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित ग्रामस्थांना कायमस्वरूपी डॉक्टर ग्रामीण रुग्णालय पेंडूर येथे देऊ अशा स्वरूपाचे लेखी आश्वासन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय आरोग्य विभागात अनेक ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने अवस्था बिकट होत चालली आहे. परंतु या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी याना गंभीरतेने लक्ष द्यायला वेळ नाही. मालवण तालुक्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या ग्रामीण रुग्णालय पेंडूरची “डॉक्टर विना रुग्णालय” अशीच केविलवाणी अवस्था झाली आहे. या रुग्णालयात सकाळच्या सत्रात तात्पुरत्या स्वरुपात ओपीडी साठी जिल्ह्यातील डाँक्टर रुग्णांना उपचार करण्यासाठी येतात. त्यानंतर जर रूग्ण उपचारासाठी गेल्यास डॉक्टरच नाहीत अशी दयनीय स्थिती आहे. गोरगरिबांना वाचविण्यासाठी बांधण्यात आलेल्या या रुग्णालयात डॉक्टरच नसतील तर मग त्याचा उपयोग काय? असा सवाल येथे उपचार करणायासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्ण तसेच जनतेतून अनेकदा उपस्थित केला जात आहे. या रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा यासाठी येथील ग्रामस्थांनी नेहमी मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्षच केले गेले. पेंडूर कट्टा दशक्रोशीत कोणताही छोटा मोठा अपघात घडल्यास प्राथमिक उपचार करण्यासाठी डाँक्टर नसल्याने जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.. दरम्यान, मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी याची ग्रामीण रुग्णालय पेंडूर येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. याची माहिती येथील स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी एकत्र येत पेंडूर ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेल्या बैठकी वेळी अचानक हजेरी लावली. यावेळी ग्रामस्थानी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांचा पाढा वाचत या रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा अशी मागणी केली. तसेच ठोस उत्तर मिळाल्याशिवाय येथून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एच. चव्हाण यांनी कायमस्वरूपी डॉक्टर ग्रामीण रुग्णालय पेंडूर येथे देऊ अशा स्वरूपाचे लेखी आश्वासन दिले. यावेळी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, माजी सरपंच सतीश वाईरकर, छोटू ढोलम, भाजप विभागप्रमुख बबन पांचाळ, शिवसेना विभागप्रमुख शिवा भोजने, वंदेश ढोलम, विनीत खडपे, विकास लुडबे, आनंद करावडे, धोंडी लुडबे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page