फुक्याचे श्रेय कोणी घेऊ नये; दिपाली भालेकर
सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी प्रभाग क्रमांक १ मधील सर्व विकासकामे नगरसेविका असताना मंजूर केली असून, गेली दोन वर्ष कोरोनामुळे निधी अभावी ही कामे रखडली होती. परंतु, आता या कामांचे टेंडर प्रोसेसिंग सुरू असून, लवकरात लवकर ही कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे कोणी फुक्याचे श्रेय घेऊ नये असा सल्ला माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी प्रसिद्धीपत्रकद्वारे दिला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, नगरसेविका असताना प्रभागातील विकास कामांना पाठपुरावा करून मंजुरी मिळवली होती.
परंतु, कोरोना मुळे निधी न आल्याने ही सर्व कामे स्थगित झाली होती. परंतु, ही कामे पूर्ण व्हावीत यासाठी आपण कायम पाठपुरावा करत होतो. परंतु, काहीजण आयत्या वेळी येऊन श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. असा टोला देखील त्यांनी कोणाचे नाव न घेता विरोधकांना लगावला आहे. प्रभाग क्रमांक १ मधील कुणकेरी रस्ता राऊळ हॉटेल ते शममी काजरेकर घरापर्यंत रस्त्याचे नुतनीकरण करणे, जलालशहा पिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गटार बांधकाम करून तो बंदिस्त करणे, प्रभाग क्रमांक १ मधील अनेक भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करून काही भागात संरक्षण भिंत बांधणे, काही भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, काही भागातील पानदी मध्ये सिमेंट काँक्रिटिंग करणे, लाखे वस्ती येथे शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीची विहीर बांधणे, लाखे वस्ती येथे जिम साहित्य देणे. अशा विविध कामांना मंजुरी आपल्या पाठपुराव्याने मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
