सागरी गृहरक्षक नितेश गुरव, अनिकेत परब यांचे धाडसाचे पोलिस अधीक्षक डॉ दहिकर यांनी केले कौतुक..

⚡ओरोस, ता. १४-: आचरा समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेला तरुण पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर तो बुडत असल्याचे लक्षात येताच गृहरक्षक दलाच्या नितेश गुरव आणि अनिकेत परब या दोन जवानांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचविले. या धाडसी कर्तृत्वाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम यांनी प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कुटुंबीयांसमवेत समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेला २५ वर्षीय तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरला; मात्र समुद्राच्या खोल भागात गेल्यानंतर अचानक पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने तो बुडू लागला. कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू करताच परिसरात गस्त घालणाऱ्या सागरी गृहरक्षक दलाच्या दोन जवानांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी त्या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले. आचरा बंदर परिसरात काल (ता. १३) घडलेल्या या घटनेत नितेश गुरव आणि अनिकेत परब या दोन जवानांच्या प्रसंगावधानामुळे मोहम्मद खान (वय २५) या तरुणाचे प्राण वाचले.
यावेळी बोलताना पोलिस अधीक्षक डॉ दहिकर यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून, विविध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. अनेकदा समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा दुर्घटनांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील महत्त्वाच्या सागरी लँडिंग पॉइंट्सवर गेल्या काही महिन्यांपासून सागरी गृहरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मूळचा या भागातील रहिवासी असलेला मोहम्मद खान हा आपल्या गावी आला होता. कुटुंबीयांसमवेत तो आचरा बंदर परिसरात गेला होता. त्यावेळी पोहण्यासाठी समुद्रात उतरलेला खान काही अंतर पुढे गेल्यानंतर खोल पाण्यात पोहोचला. समुद्रातील पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्यामुळे तो प्रवाहाबरोबर खेचला जाऊ लागला. त्यामुळे त्याची धडपड सुरू झाली.
हा प्रकार लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचवेळी बंदर परिसरात गस्तीवर असलेले सागरी गृहरक्षक नितेश गुरव आणि अनिकेत परब यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही जवानांनी तत्काळ बचावासाठी धाव घेतली. समुद्रात उतरून त्यांनी प्रवाहात अडकलेल्या खानला बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
जिल्ह्यातील सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने पोलिस प्रशासनाने महत्त्वाच्या लँडिंग पॉइंट्सवर गस्त आणि सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे. प्रामुख्याने सागरी सुरक्षा आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या या जवानांनी आपत्कालीन परिस्थितीतही तत्परता दाखविली. त्यामुळे सागरी सुरक्षेसाठी तैनात केलेली यंत्रणा नागरिकांच्या जीवितरक्षणासाठीही उपयुक्त ठरत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
या दोन्ही जवानांनी दाखविलेल्या धाडसाची दखल पोलिस प्रशासनाने घेतली असून, त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. संबंधित गृहरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही याबाबत संवाद साधण्यात येणार असल्याचे डॉ दहिकर यांनी सांगितले.
