Headlines

दोन गुन्ह्यांचा एकच सूत्रधार…

पावशी, पिंगुळीतील महिलांना लुटणारा एकनाथ कराळेकर जेरबंद; १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत:सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांनी लावला छडा; पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची पत्रकार परिषदेत माहिती..

⚡ओरोस, ता. १४ -: कधी रस्ता विचारण्याचा बहाणा, तर कधी पिण्यासाठी पाणी मागून महिलांना बोलण्यात गुंतवायचे आणि संधी साधून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढायचा, अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. एकनाथ रामचंद्र कराळेकर (वय ४७, रा. एमआयडीसी, वरची कुंभारवाडी, ता. कुडाळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पावशी येथे १२ ऑक्टोबरला घडलेल्या सोनसाखळी चोरीचा तपास करताना महिनाभरा पूर्वी पिंगुळी येथे वृद्ध महिलेवर स्प्रे मारून मंगळसूत्र हिसकावल्याच्या गुन्ह्याचाही उलगडा झाला. विशेष म्हणजे, दोन्ही घटनास्थळांच्या परिसरात सीसीटीव्ही नसतानाही तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून रोख १५ हजार ५०० रुपये, दीड लाख रुपयांची दुचाकी, हेल्मेट आणि स्प्रे असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी आज दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे उपस्थित होते.
डॉ. दहिकर यांनी सांगितले, की १२ ऑक्टोबरला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पावशी-बेलनदीवाडी येथील अनिता अशोक अंधारी (वय ५०) या पावशी ते घावनळे जाणाऱ्या रस्त्यावर कुडाळला जाण्यासाठी उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याजवळ येऊन घावनळेकडे जाणारा रस्ता कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ खेचून तोडली. त्यातील सुमारे सहा ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ घेऊन संशयिताने पलायन केले. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात १३ ऑक्टोबरला भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वी ९ सप्टेंबरला पिंगुळी-सराफदारवाडी येथेही अशाच प्रकारचा गुन्हा घडला होता. एका वृद्ध महिलेच्या घरात अनोळखी व्यक्तीने दरवाजावर थाप मारली. महिलेने दरवाजा उघडताच तिच्या तोंडावर स्प्रे मारून गळ्यातील २४ ग्रॅम वजनाचे सुमारे ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६), ११५(५), ३(५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.

You cannot copy content of this page