मालवण बंदर जेटी येथील स्टॉलधारक व्यावसायिकांवर कारवाई करू नये

निलेश राणे यांची मेरीटाइम बोर्डाकडे विनंती

मालवण ता.२०-:* मालवण बंदर जेटी येथील स्टॉल सात दिवसांच्या आत हटविण्यात याव्यात अशा आशयाच्या नोटिसा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने संबंधित स्टॉलधारक व्यावसायिकांना बजावल्याने स्टॉल धारकांमध्ये चलबिचल सुरू असताना या पार्श्वभूमीवर स्थानिक स्टॉलधारकांनी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले आहे.

यावर निलेश राणे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे क्षेत्रिय अधिकारी अमित सैनी यांची भेट घेत व्यावसायिकांवर कारवाई करू नये अशी विनंती केली आहे. या स्टॉलधारकांना कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध व्हावेत यासाठी लवकरच एक विशेष आराखडा मेरिटाईम बोर्डास सादर करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती विजय केनवडेकर यांनी दिली. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून मालवण बंदर जेटीवरील स्टॉलधारकांना सात दिवसात स्टॉल हटवून जागा मोकळी करून देण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

या संदर्भात माजी नगरसेविका पूजा सरकारे, दामोदर तोडणकर, संजय नार्वेकर व अन्य स्टॉलधारकांनी माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. सर्व व्यावसायीकांचा विचार करता श्री. राणे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे क्षेत्रीय अधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन संबंधित स्टॉलधारकांवर कारवाई करू नये अशी विनंती केली. सर्व स्टॉलधारकांना कायमस्वरूपी स्टॉल कसे उपलब्ध करून देता येतील यासंबंधी चर्चा केली. त्याचबरोबर बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांच्याशी चर्चा करून कोरोनाच्या महामारीमध्ये स्टॉलधारकांचे झालेले आर्थिक नुकसान पाहता या छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, अशी विनंती केली आहे.

You cannot copy content of this page