Headlines

‘सिंधु जनसंवाद’ आरोग्य यात्रेचा उद्या शुभारंभ…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नांदगावात प्रारंभ; आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ..

⚡ओरोस, ता. १४ -: माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या यात्रेचा शुभारंभ उद्या (ता. १५) सकाळी अकराला कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने नागरिकांची आरोग्य तपासणी, आयुष्मान कार्ड, वयवंदना कार्ड आणि आभा कार्ड यांसह विविध आरोग्यविषयक सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे.
‘सुदृढ समाज, निरोगी समाज, सक्षम सिंधुदुर्ग’ या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे, आरोग्यविषयक योजनांची माहिती देणे आणि नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे, हा या यात्रेचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यात्रेच्या शुभारंभानिमित्त नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच आयुष्मान भारत योजनेचे कार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयवंदना कार्ड आणि डिजिटल आरोग्य नोंदींसाठी आभा कार्ड यांसंदर्भातील सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या यात्रेच्या माध्यमातून केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित न राहता गावपातळीवरील आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेण्यावरही भर देण्यात येणार आहे. त्यासाठी नांदगाव येथील अंगणवाडी क्रमांक एक, केंद्रशाळा क्रमांक एक, सरस्वती प्राथमिक विद्यालय आणि ग्रामपंचायतीला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे यांच्यासह संबंधित यंत्रणांचा सहभाग राहणार आहे.

चौकट :
आरोग्य यात्रेत काय मिळणार?
नागरिकांची आरोग्य तपासणी, आयुष्मान कार्डसंबंधी सेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयवंदना कार्ड, डिजिटल आरोग्य ओळखीसाठी आभा कार्ड, अंगणवाडी, शाळा आणि ग्रामपंचायतींना भेटी, आरोग्यसेवा आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page