Headlines

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’चा जागर…

जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचे उपक्रम राबविण्याचे आवाहन..

⚡ओरोस, ता. १४-: ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’ हा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी उद्या (ता. १५) जागतिक हात धुवा दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांसह ग्रामपंचायत आणि शाळास्तरावर हात धुण्याची प्रात्यक्षिके, जनजागृती रॅली, रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व आणि पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. हात धुण्याची सवय केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्यासाठी सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दरवर्षी १५ ऑक्टोबरला जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात येतो. यंदा ‘Our Future is at Hand – Let’s Move Forward Together’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून निरोगी भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश आहे.
हात स्वच्छ धुणे ही साधी वाटणारी; मात्र आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची सवय आहे. योग्य पद्धतीने साबणाने हात धुतल्यास अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होते. विशेषतः जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच दैनंदिन कामकाजात आवश्यक त्या वेळी साबणाने हात धुणे गरजेचे आहे. याबाबत शालेय विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात तसेच सार्वजनिक ठिकाणी साबणाने हात धुण्याची प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. या प्रात्यक्षिकांतून हात धुण्याची योग्य पद्धत आणि त्याचे आरोग्यविषयक महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून साबण संकलनासाठी जनजागृती रॅली काढण्यात येणार असून, त्याद्वारे शाळांमध्ये हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धता वाढविण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण करण्यासाठी शाळा आणि गावपातळीवर रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला व पोस्टरनिर्मिती स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, महिला बचतगट आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती डॉ. बासुर यांनी दिली.

You cannot copy content of this page