सावंतवाडी, ता. १४-: सावंतवाडी शहरातील एका दुकानाला काल रात्री अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत-भोंसले यांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर तसेच नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्षांनी आगीची तीव्रता तसेच दुकानाचे झालेले नुकसान याची माहिती घेतली. तसेच संबंधित यंत्रणेकडून घटनेचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. या दुर्घटनेमुळे दुकानमालकाचे मोठे नुकसान झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.”

