मंदिर ट्रस्टचा निर्णय;नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घेतला निर्णय
मालवण (प्रतिनिधी) सुकळवाड येथील हनुमान मंदिरातील हनुमानाच्या जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर जुन्या मूर्तीचे जतन करण्यासाठी मूर्ती मालवण येथील संग्रहकार उदय रोगे यांच्या शिवमुद्रा संग्रहालयालात ठेवण्याचा निर्णय हनुमान मंदिर ट्रस्टने घेतला आहे. सुकळवाड येथून मालवण बंदर जेटी पर्यंत हनुमान मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढून समुद्रात औपचारिक विसर्जन केल्यावर ही मूर्ती उदय रोगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. हनुमान मंदिर ट्रस्ट सुकळवाड बाजारपेठ येथील सुमारे चाळीस वर्षा पूर्वी उद्योगपती प्रेमानंद वैद्य यांनी हनुमान मंदिराचे बांधकाम करून हनुमानाची मुर्ती दिली होती.
ही मूर्ती काही कारणास्तव बदलावी लागल्याने जुन्या चाळीस वर्षा पूर्वीच्या मूर्तीचे जतन करण्याची इच्छा राजू वैद्य यांनी प्रकट केली. त्याला हनुमान मंदिर ट्रस्ट सुकळवाडचे सदस्य व गावकऱ्यांनी सहमती दर्शविल्यानंतर हनुमानाची मूर्ती जतन व संवर्धन करण्यासाठी मालवणातील शिवमुद्रा संग्रहालय येथे ठेवण्याचा निर्णय घेतला. सोनोजी तोडणकर, बाळू अकेरकर यांनी सहकार्य केले. हनुमान भक्तांनीही या निर्णयास संमती दर्शवली. यासाठी संग्रहकार उदय रोगे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
त्यानुसार रविवारी ही मूर्ती रामनामाच्या गजरात सुकळवाड बाजारपेठ येथून मालवण बंदर जेटीवर आणण्यात आली. तेथे औपचारिक विसर्जन करून शिवमुद्रा संग्रहालयात ठेवण्यात आली. यावेळी हनुमान मंदिर ट्रस्ट सुकळवाडचे सदस्य व गावकरी उपस्थित होते. संग्रहकार उदय रोगे यांनीही या निर्णयाचे कौतुक करून इतिहास जतन व संवर्धन करणार हे बोलणे सहज सोपे असते. परंतु कृती करणे मात्र अतिशय अवघड असते व ही कृती सुकळवाड बाजारपेठ हनुमान मंदिर ट्रस्ट यांनी केलेली आहे, त्याबद्दल कौतुक आहे असे सांगितले.
