कणकवली ता.२८-:* मध्ययुगीन काळात जात, धर्म, रुढी परंपरा, अंधश्रद्धा यांच्या कुचक्रामध्ये पूर्णपणे फसलेल्या व त्याचे आंधळेपणाने पालन करणाऱ्या समाजाचे डोळे उघडण्याचे व विवेकवादी स्पष्ट भूमिका घेण्याचे काम कबीर आणि तुलसीदास या कवींनी केले आहे. दुर्दैवाने आजही या संदर्भात परिस्थिती फार काही बदललेली नाही त्यामुळे या कवींचे विचार आजही प्रासंगिक ठरतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक व समीक्षक प्रो. डॉ. शीतला प्रसाद दुबे ( मुंबई) यांनी व्यक्त केले. ते येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेजमध्ये हिंदी विभाग आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाच्या अनुषंगाने आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ‘वर्तमान परिदृश्य और कबीरदास’ या विषयावर बोलत होते.
हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. लालासाहेब घोरपडे यांनी व्याख्यानाचे प्रयोजन स्पष्ट करून महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या माध्यमातून हिंदी भाषेच्या व साहित्याच्या संवर्धनासाठी, विकासासाठी, प्रचार तथा प्रसारासाठी कसे काम केले जाते ते स्पष्ट केले.
या व्याख्यानमालेत दुसरे वक्ते प्रो. डॉ.सत्येंद्र शर्मा यांनी ‘तुलसी की लोक मंगल दृष्टि’ या विषयावर आपले मौलिक विचार मांडले. यांनी आपल्या विवेचनात तुलसीदासांनी रामाच्या लोककल्याणासाठी केलेल्या कामाचे संदर्भ देत सज्जनाचे रक्षण करण्यासाठी सदाचारी, कर्तव्यपरायण राजाने विवेक बुद्धीने कसे निर्णय घेतले ते अनेक संदर्भ देऊन स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. लालासाहेब घोरपडे यांनी व सूत्रसंचालन प्रा.डॉ. भिकाजी कांबळे यांनी केले. आभार प्रा. दीपा तेंडोलकर यांनी मानले. या कार्यक्रमास देशातील वेगवेगळ्या राज्यामधील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.
