कणकवली ता.२८-:* मराठी साहित्यातील दर्जेदार कलाकृतींचे इतर भाषात अनुवाद झाला तर मराठी साहित्य सर्वदूर पसरेल व आपला एक वेगळा ठसा उमटू शकेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले. कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले बोलत होते. प्रत्येकाने भाषा निरपेक्ष असले पाहिजे तसेच इतर भाषांचाही आपण आदर करायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा. सीमा हडकर व प्रा. विनिता ढोके उपस्थित होते. प्रा. सीमा हडकर यांनी मराठी साहित्यात भावभावनांचे विचारांचे व परिस्थितीचे चित्रण असते आज समाजमाध्यमे ही प्रचलित मार्गापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने भाषेचा अविष्कार करत आहेत. त्यामुळे त्या त्या काळाचे प्रतिबिंब त्या त्या भाषेत निश्चितच उमटलेले आहे जरी मराठी भाषेने इतर भाषेतील शब्द स्वीकारून भाषा समृद्ध केली असली तरी ज्या शब्दांना सुंदर मराठी शब्द आहेत ते आपण वापरले पाहिजेत तरच आपली भाषा टिकून राहील असे मत व्यक्त केले.
प्रा. विनिता ढोके यांनी मराठी भाषेतील ध्रुवतारा कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेऊन मराठी भाषा प्रत्येकाने आपापल्या घरात बोलली पाहिजे लहान मुलांना त्या भाषेतील शब्द चटकन समजतील असे समजावून सांगितले पाहिजेत व मराठी भाषेचे महत्व वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले .तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागातर्फे ‘माय मराठी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. अभंग, ओवी , पंडिती काव्य ,लावणी ते भावगीते सादर करून मराठी साहित्यातील प्राचीन अर्वाचीन व आधुनिक काव्याचे दर्शन घडवून आणले त्याचबरोबर गानसम्राज्ञी लतादीदींना या गीतातून आदरांजली देण्यात आली प्रास्ताविक प्रा. विजयकुमार सावंत यांनी केले .तर सूत्रसंचालन मृणाल गावकर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहा वंजारे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
