घरगुती एलपीजी बुकिंगवरील २५ दिवसांची अट शिथिल करण्याची मागणी: नगरसेवक मंदार शिरसाठ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगवरील २५ दिवसांची अट तात्पुरती शिथिल करावी तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना उबाठा नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाठ यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकणातील गणेशोत्सव हा अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण असून या काळात मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून लाखो चाकरमानी आपल्या गावी परततात. त्यामुळे प्रत्येक घरात पाहुण्यांची संख्या वाढते आणि महाप्रसाद तसेच विविध खाद्यपदार्थांच्या तयारीमुळे घरगुती गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत सध्या लागू असलेला २५ दिवसांनंतरच दुसरे सिलिंडर बुक करता येण्याचा नियम नागरिकांसाठी मोठी अडचण ठरू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ही बाब लक्षात घेऊन गणेश चतुर्थीच्या १५ दिवस आधीपासून ते उत्सवानंतरच्या १५ दिवसांपर्यंत, म्हणजे एक महिन्याच्या कालावधीत, घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगवरील २५ दिवसांची अट तात्पुरती शिथिल करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गरज भासल्यास नागरिकांना दुसरे सिलिंडर तातडीने उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात हॉटेल्स, खानावळी, उपहारगृहे, बेकरी, मिठाईची दुकाने आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची मागणीही वाढते. त्यामुळे या कालावधीत कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी गॅस कंपन्यांना अतिरिक्त ‘बफर स्टॉक’ उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने द्याव्यात, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासारख्या कोकणवासीयांच्या श्रद्धा आणि अस्मितेशी निगडित सणात कोणत्याही कुटुंबाला किंवा व्यापाऱ्यांना गॅसअभावी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गॅस कंपन्यांशी तातडीने समन्वय साधून आगाऊ नियोजन करावे, अशी अपेक्षा नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी नगरसेवक संतोष शिरसाठ, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी तसेच अमित राणे, शैलेश काळप, संदीप म्हाडेश्वर आणि गुरु गडकर उपस्थित होते.
