कणकवलीची पत्रकारीता प्रगल्भ, वैचारिक

कणकवली तालुका पत्रकार समिती आयोजित पुरस्कार वितरण व स्नेहमेळावा प्रसंगी मान्यवरांचे कौतुकोद्गार

कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्याची पत्रकारीता नेहमीच प्रगल्भ वैचारीक राहीली आहे. वाचकांचा विश्वास जपण्याचे काम कणकवली पत्रकार समितीने नेहमीच केले आहे. अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी ही समिती नेहमीच पुढे राहीली आहे. पत्रकार समितीने ही विश्वासाहर्तता यापुढेही कायम जपावी, अशा शब्दांमध्ये विविध मान्यवरांनी कौतुक केले. कणकवली तालुका पत्रकार समितीचा पारितोषीक वितरण सोहळा तसेच पत्रकार व कुटुंबियांचा स्नेहमेळावा पिसेकामते येथील मैत्री गार्डन रिसॉर्ट येथे पार पडला. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी व्यासपिठावर तहसीलदार रमेश पवार, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष वायंगणकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, लावण्यसिंधू संस्थेचे चंद्रशेखर उपरकर, कणकवली पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई आदी उपस्थित होते . तसेच आमदार वैभव नाईक , शिवसेना नेते संदेश पारकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक , प्रतिथयश वकील अॅड. उमेश सावंत यांनीही कार्यक्रमस्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी यशस्वी उद्योजक पुरस्कार त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शनचे रघुनाथ नाईक तसेच विल्बर्ट प्रॉपर्टीचे विल्सन पिंटो व दिनेश कुंभार यांना प्रदान करण्यात आला . सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सर्पमित्र तथा फोंडाघाट हेल्प अॅकॅडमीचे संजय नेरूरकर यांना प्रदान करण्यात आला .

पत्रकारीतेमधील बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी, शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे , उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार गुरुप्रसाद सावंत, अनिल सावंत स्मृती ग्रामिण पत्रकार पुरस्कार ऋषीकेश मोरजकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कणकवली तालुका पत्रकार समिती आयोजित निबंध स्पर्धा तसेच कणकवली तालुका पत्रकार समिती व पत्रकार आणि मित्र यांच्या माध्यमातून आयोजित हस्ताक्षर स्पर्धेच्या विजेत्यांनाही गौरविण्यात आले. कणकवलीची पत्रकारीता वैचारीक वैशाली राजमाने म्हणाल्या, कणकवली तालुक्याची पत्रकारीता प्रगल्भ आणि वैचारीक आहे.

वृत्तपत्रे ही प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कणकवली पत्रकार समितीने आपल्या क्षेत्रापुरते मर्यादिन न राहता सामाजिकतेचे भानही जपले आहे. आज पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये दिले गेलेले उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हे त्याचेच उदाहरण आहे. प्रत्येक चांगल्या बाबीला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम कणकवली पत्रकार समितीने यापुढेही आयोजित करावेत. तहसीलदार रमेश पवार म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार समितीने अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा प्रसार करण्यासाठी असतात. सामाजिक प्रबोधन, समाजाच्या अडचणी सोडविणे, अन्यायग्रस्तांना न्याय देणे हेच पत्रकाराचे काम आहे.

अर्थात कणकवली तालुक्यातील पत्रकार याबाबतीत नेहमीच अग्रस्थानी राहीले आहेत. पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर म्हणाले, पोलीस म्हणून कार्यरत असताना राज्यभर पोस्टींग झाल्या . पण , कणकवली तालुक्यासारखी पत्रकारीता इतरत्र क्वचितच दिसते. येथील पत्रकारीता ‘कॉपी पेस्ट’ नसून स्वतंत्र विचार करणारी आहे. आधुनिकतेत दिवसेंदिवस वाढ होत असून भविष्यात पत्रकारीतेतही बदल घडणार आहेत . कदाचित परग्रहावरूनही बातमीपत्रे सादर होतील. या आव्हानांसाठीही पत्रकारांनी सज्ज रहावे. लेखणी ही तलवारीपेक्षाही धारदार असते. त्यामुळे पत्रकारांनी विवेकबुद्दी जागृत ठेवून लेखणी वापरायला हवी.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे म्हणाले, कणकवली पत्रकार समितीने मागील काही वर्षांपासून आयोजित केलेल्या ‘गेट टू गेदर’ची ख्याती आता राज्यभर पोहोचली असून याच संघापासून प्रेरणा घेऊन राज्यभरातील पत्रकार संघटनांमार्फत कुटुंबियांसह गेट टूगेदर’चे आयोजन केले जात आहे. पत्रकारांचे जीवन कष्टप्रद आहे. मात्र , जिल्ह्यासह कणकवलीतील पत्रकारांनी नेहमीच समाजहीत डोळ्यासमोर ठेवले. प्रास्ताविकात चंद्रशेखर देसाई म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे गेली अनेक वर्षे उद्योग, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना गौरविले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी निबंध, हस्ताक्षर अशा स्पर्धाही घेतल्या जातात. चोवीस तास कार्यरत रहावे लागणारा पत्रकार आपल्या कुटुंबियांना किती वेळ देतो, हा संशोधनाचा भाग आहे . याच उद्देशाने कणकवली पत्रकार संघाने कुटुंबियांसह स्नेहमेळाव्याची योजना आखली व ती मागील अनेक वर्षे अंमलातही आणली आहे. कणकवलीच्या पत्रकारीतेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे.

You cannot copy content of this page