मालवण ता.२७-:* मराठी राज भाषा दिनानिमित्त मालवण येथील शिवाजी वाचन मंदिरतर्फे आयोजित मालवणी कविता सादरीकरण कार्यक्रमात मालवणी कवी दादा मडकईकर व रुजरिओ पिंटो यांनी विविध कविता सादर करत उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर तर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात मालवणी कविता सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये मालवणी कवी दादा मडकईकर यांनी तारिया मामा, बैल नांगर, मन, चांदण्याची फुला अशा विविध मालवणी कविता उत्तम गायनशैलीतून सादर करत कोकणी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविले. रसिकांची वाहवा मिळवली.
यावेळी त्यांनी जुन्या कवितांना लावलेल्या चालीमध्ये कवितांचे गायन करत वाहवा मिळवली. तर कवी रुजरिओ पिंटो यांनीही लोकशाय, कायच कळणा नाय, बहाणा अशा मालवणी लोकांची जीवनशैली दर्शविणारे व समाजव्यवस्थेतील विविध प्रश्न व समस्या यांच्यावर विनोदी शैलीत आवाज उठविणाऱ्या कविता सादर केल्या. या कवितांना उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा केळकर यांनी केले. यावेळी शिवाजी वाचन मंदिरच्या अध्यक्ष सौ. मेधा शेवडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, कार्यवाह सौ. वैदेही सारंग, सहकार्यवाह पद्मनाभ प्रभूझाट्ये, सदस्य सौ. राधिका कांबळी, बाळकृष्ण माणगावकर, रघुनाथ शेवडे, मनोजकुमार गिरकर आदी व इतर उपस्थित होते.
