शौचालय बांधू शकलेल्यानी घाट रस्ता दुरुस्तीच्या बढाया मारू नये

माजी आमदार परशुराम उपरकर : सत्ताधाऱ्यांना जनतेच्या विकासाचे कोणतेही सोयरसुतक नाही

*⚡वैभववाडी ता.२६-:* सत्ताधाऱ्यांना जनतेच्या विकासाचे कोणतेही सोयरसुतक नाही. केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम सुरू आहे. कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी करुळ घाट पाहणीची केवळ नौटंकी केली. नाईकांना अधिकारी किंमत देत नाहीत. टॉयलेट बांधू न शकलेल्या नाईक यांनी घाट रस्ता दुरुस्तीच्या बढाया मारू नये. अशी खरमरीत टीका माजी आमदार, मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केली. करूळ घाट मार्गाच्या कामात खूपच दिरंगाई होत आहे. याबाबतही मनसे आंदोलन छेडणार असा इशाराही उपरकर यांनी दिला.

वैभववाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, दयानंद मेस्त्री, संतोष सावंत, चंद्रशेखर सावंत, तुषार चिले, दीपक पार्टे महेश कदम व पदाधिकारी उपस्थित होते. विकास कामे सर्वत्र निकृष्ट दर्जाची सुरू आहेत. विकासाच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. तालुक्यातील जनतेला आपले प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे दालन याठिकाणी मनसेने सुरू केले आहे. या संपर्क कार्यालयात जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील असे उपरकर यांनी सांगितले.

जनतेच्या विकासासाठी राज साहेबांच्या या पक्षाचा जन्म झाला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत एका मताचा रेट तीस हजारापर्यंत पोचला आहे. ते तीस हजार रुपये किती दिवस पुरणार असा सवाल उपरकर यांनी मतदारांना विचारला. शहराचा विकास झाला नाही. काहीजण पूर्वीची ग्रामपंचायत बरी होती असे बोलत आहेत. प्रमोद जठार यांनी रेल्वे क्रॉसिंग बाबत आवाज उठवला परंतु ते कामही ठप्प आहे. पालकमंत्री उदय सामंत यांना जिल्ह्याची काहीच पडलेली नाही. राज्यातील नेतेमंडळी यांची आंगणेवाडीच्या भराडीदेवीवर अफाट श्रद्धा आहे. बरेच मंडळी हे यात्रेनिमित्त जिल्ह्यात दाखल झाले. परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी गेले. कोकणचे सुपुत्र असलेल्या पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. उपरकर म्हणाले, गावागावात जाऊन मनसे पदाधिकारी पक्षबांधणी कडे अधिक लक्ष यापुढील काळात देतील. पुढील होणाऱ्या जि. प. व पंचायत समिती निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे. पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढली पाहिजे. जय पराजय हा होतच असतो. परंतु निवडणूक रिंगणात उतरावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.

You cannot copy content of this page