ब्लॉग आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायला शिका – ऋषी देसाई

मालवण (प्रतिनिधी) आज आपल्या हातात सोशल मीडियाचे मोठे व्यासपीठ आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी मांडत राहिल्या पाहिजेत. ब्लॉग आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन प्रतिपादन लोकशाही टिव्ही चॅनलचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात ब्लॉग लेखन या विषयाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना ब्लॉग लेखन म्हणजे काय, त्याची उपयुक्तता काय, इत्यादी गोष्टी प्रत्यक्षात समजाव्यात या उद्देशाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने “ब्लॉग लेखन आणि मी” या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा. कैलास राबते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. रामचंद्र काटकर यांच्या हस्ते ऋषी देसाई यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. काटकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून सर्वांचे स्वागत केले. डॉ. सुमेधा नाईक यांनी ऋषी देसाई यांचा सविस्तर परिचय करून दिला. यावेळी ऋषी देसाई म्हणाले, कितीतरी अशा गोष्टी असतात की ज्यावर कुणाला तरी माहिती हवी असते कोणी तरी अभ्यास करत असतो, ते त्या गोष्टी शोधत असतात, त्यांना हव्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या ब्लॉग मधून त्यांना मिळतात, म्हणून आपण ब्लॉग व सोशल मीडियाद्वारे सतत व्यक्त होत राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. ब्लॉग का लिहायचा, त्याचे विविध उद्देशांवर आधारित दहा प्रकार, ब्लॉगिंगचा इतिहास, इत्यादी विषयी ऋषी देसाई यांनी अनेक उदाहरणे देऊन सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शन केले.

मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ब्लॉग लेखकांचा, व्हिडिओ ब्लॉगिंग करणाऱ्या मंडळींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणाऱ्या ऋषी देसाई यांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणी देखील जागवल्या. कॉलेजचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा पण सगळ्यात छोटा कालावधी आपल्याला मिळतो, तो काही केले तरी परत येत नाही, त्याचा पुरेपूर उपयोग करा, असे कळकळीचे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमेधा नाईक यांनी केले. प्रा. एच. एम. चौगले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग, ज्युनिअर आणि सिनियर विभागांचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page