कणकवली 25 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- मराठी राजभाषा दिनानिमित्त तळेरे येथील संवाद परिवाराच्या वतीने निमंत्रित कवींचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हे काव्य संमेलन गझलकार,कवी मधुसूदन नानिवडेकर यांचा स्मृती जागर म्हणून विशेष आयोजित केले आहे.
सुप्रसिध्द गझलकार डॉ. माधुरी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कवी संमेलनामध्ये सुप्रसिध्द मालवणी कवयित्री सौ. सुनंदा कांबळे (विजयदुर्ग), डॉ.प्रकाश बावधणकर (तळेरे), डॉ. सतिश पवार (कणकवली), श्री. संतोष टक्के (वैभववाडी) आणि श्री. प्रमोद कोयंडे (तळेरे)* सहभागी होणार आहेत.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सहभागी कवी आपल्या कवितेसोबत गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्याही कविता सादर करणार आहेत. गझलकार,कवी मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती कविता आणि गझलांमधून अखंडपणे तेवत रहाव्यात यासाठी स्मृती जागर आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ठीक ७ वा.तळेरे येथील डॉ.मिलिंद व डाॅ.ऋचा कुलकर्णी यांच्या चैतन्य नर्सिंग होमच्या पटांगणात संपन्न होणार आहे.गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती जागर काव्य संमेलनाला रसिकांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.
