अणाव घाटचेपेड नदी पुलाचा प्रश्न; भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल आक्रमक
सिंधुदुर्गनगरी ता २४ अणाव घाटचेपेड येथील पीठढवळ नदीवरील पुलाचे अर्धवट राहिलेले काम ९ एप्रिल २०२२ पूर्वी पूर्ववत नियमित सुरू करा .अन्यथा १० एप्रिल पासून सर्व ग्रामस्थांसह सदर नदीपात्रामध्ये साखळी उपोषणासाठी बसणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे कुडाळ तालुका अध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी दिला आहे. कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचेपेड वाडीला जोडणाऱ्या पीठढवळ नदीवरील पुलाचे बांधकाम सन २०१९ मध्ये मोठ्या गाजावादात सुरु करण्यात आले.
परन्तु सदर पुलाच्या पिलरचे बांधकाम झाल्यानंतर गेले अडीज वर्षे हे काम पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या पुलाचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही बांधकाम विभागाच्या दुर्लक्षमुळे निधी अखर्चित राहिला आहे. आणि नागरिकांचीही गैरसोय झाली आहे. कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचेपेड़ येथील या पुलाचा अणाव, पालववाडी, परबवाडी, घाटचेपेड़वाडी, आंबेडकरनगर, जय भवानीनगर, मयेकर वाडी, पाटीलवाडी, शेळणवाडी, बामणवाडी, देऊळवाडी तसेच दाबाचीवाडी येथील सुमारे ३००० ग्रामस्थ तसेच नर्सिंग कॉलेज च्या सुमारे ३०० पेक्षा अधिक विद्यार्थिनीना उपयोग होणार आहे. तरी या अर्धवट राहिलेल्या पुलाच्या बांधकामाची गंभीर दाखल घेऊन पुलाचे काम तात्काळ सुरु करावे .९ एप्रिल पूर्वी सदर पुलाचे काम पुर्ववत नियमित सुरु न झाल्यास १० एप्रिल पासून सर्व ग्रामस्था सहित सदर नदीपात्रात साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा सार्वजानिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याना दिलेल्या निवेदनातून तुकाराम (दादा) साईल यांनी दिला आहे.
