नगरसेवक कन्हैया पारकर व रुपेश नार्वेकर यांचा टोला
कणकवली ता.२४-:* कै. श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरण कामासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतून 75 लाखांचा निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 जून 2021 रोजीच कै. श्रीधर नाईक गार्डन नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याची माहिती समस्त कणकवलीवासीयांना आहे. त्यामुळे कै.श्रीधर नाईक गार्डन कामाचे भूमिपूजन केवळ श्रेयासाठी पुन्हा करून राणेंची खूषमस्करी करण्याचा नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर यांनी केली आहे.
हायवे चौपदरीकरणात श्रीधर नाईक उद्यानची जागा संपादित झाल्यानंतर उर्वरित जागेत उद्यान नूतनीकरण करण्याचा पालकमंत्री सामंत यांनी शब्द दिला होता. त्यानुसार तब्बल 75 लाखांची तरतूद पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून एप्रिल 2021 मध्ये केली. 11 जून 2021 श्रीधर नाईक गार्डन कामाचे टेंडर निघून ते मंजूर ही झाले. व त्यानंतर पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते 22 जून रोजी कै.श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनी गार्डनचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. 22 जून रोजी झालेल्या गार्डन भूमिपूजन वेळी कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच प्रशासन अधिकारी उपस्थित होते. असे असताना नगराध्यक्ष पुन्हा माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते श्रीधर नाईक गार्डनचे भूमीपूजन करून निलेश राणेंची दिशाभूल करताहेत ?की कणकवलीवासीयांची? उलट 11 जूनला टेंडर होऊन सुद्धा काम सुरू करायला एवढा वेळ का लागला याचं उत्तर कणकवलीवासीयांना द्यावे.निलेश राणे यांनी खासदारकीच्या काळात कणकवली शहर विकासासाठी काय केले ? असा खडा सवालही पारकर, नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे.
