कणकवलीत परिवर्तनच्या कला महोत्सवाचा जागर आचरेकर प्रतिष्ठान येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

कणकवली 24 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- जळगावसह खानदेशच्या सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील संस्था म्हणून परिवर्तन ओळखली जाते. गेल्या काही वर्षपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. कोरोनामुळे मागील वर्षी आठ महोत्सव रद्द करण्यात आले होते. पण आता कणकवलीत परीवर्तन कला महोत्सव २५, २६ व २७ फेब्रुवारी, २०२२ असे तीन दिवस होत आहे. कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाची सुरवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित “अरे संसार संसार” कार्यक्रमाने दि. २५ रोजी होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. २६ रोजी श्रीकांत देशमुख लिखित व शंभु पाटील नाट्यरुपांतरीत योगेश पाटील दिग्दर्शित “नली” एकलनाट्य, २७ रोजी शंभु पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित “अमृता साहिर इमरोज” हे नाटक सादर होणार आहे. तीन दिवस एका संस्थेची निर्मिती असलेले तीन उत्तम कार्यक्रम असलेला खानदेशचा महोत्सव कोकणात पहिल्यांदा होतो आहे. आचरेकर प्रतिष्ठानने परिवर्तन जळगावचा केलेला हा सन्मान आहे. हा महोत्सव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात होणार आहे. परिवर्तनची नाटके व सांगीतिक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सादर होत असतात. ही जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी ऊर्जा देणारी गोष्ट आहे. सर्जनशील निर्मिती हे परिवर्तचे वैशिष्टे आहे. ‘अरे संसार संसार’चे आतापर्यंत 26 प्रयोग, ‘नली’चे ५१ व ‘अमृता साहीर इमरोज’ चे 5 यशस्वी प्रयोग झाले आहेत. या महोत्सवासाठी आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित, शरद सावंत हे मेहनत घेत आहेत. कोकणातील हा महोत्सव परिवर्तनसाठी खूप महत्वाचा आहे.

You cannot copy content of this page