कणकवली ता.२४-:* रोहिदास समाजाचे आद्यगुरू आणि धर्मगुरू संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि विभागात साजरी करण्यात आली.
संत शिरोमणी रोहिदास महाराज हे विज्ञानवादी गुरू असून त्यांचे दोहे अनेक धर्म आणि समाजासाठी प्रेरणादायी आहेत. शासन निर्णयानुसार सन २०१८ पासून देशातील काही राष्ट्रीय संतांची जयंती ही विविध संस्था, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत तसेच सहकारी संस्था यामध्ये साजरी करण्याचे आदेश आहेत. त्याला अनुसरून संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने सन २०१९ साली तसेच २०२२ मध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, मुंबई इत्यादी जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये जवळपास १५० रोहिदास महाराज प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आल्या आहेत. संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संस्थेच्या वतीने देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये रोहिदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. संस्थेच्या वतीने राज्यभरात दरवर्षी मोठ्या उत्साहात रोहिदास जयंती साजरी होत आहे तसेच जयंतीची व्याप्ती वाढत असून रोहिदास समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत रोहिदास महाराज यांचे विचार पोचून त्यांना समाजाच्या वाहत्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक आणि पदाधिकारी करीत आहेत.
