ओरोस प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या खास सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा कळस दिसून आला. सत्ताधारी सदस्य कामाच्या याद्या वाचत होते आणि त्या कामांना मंजुरी घेत होते. त्यामुळे हे सभागृहाचे कामकाज होते की पक्षाच्या कार्यालयाचे असा प्रश्न उपस्थित करत या सभागृहात सुरू असलेले काम एका विशिष्ट पक्षाचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करत या मनमानी आणि गलथान कारभाराकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत सत्ताधाऱ्यांना त्यांच्या मनमानी कारभारात एक प्रकारे अनुमती दर्शविली असून याविरोधात nyaयालयात दाद मागणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषद खास सर्वसाधारण सभेत विविध योजनांचे आराखडे मनमानी पद्धतीने मंजूर झाल्यानंतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, प्रदीप नारकर, रोहिणी गावडे, संपदा देसाई आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी नागेंद्र परब म्हणाले की, जिल्हा परिषद खास सभेत आज सत्ताधाऱ्यांनी मनमानी पद्धतीने आराखडे आणि याद्या मंजूर करून घेतल्या. याद्या प्रशासनाकडून वाचण्यात येणे आवश्यक होते. मात्र तसे न होता याद्या व कामाचे वाचन सत्ताधाऱ्यांचे सदस्य करत होते. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेले काम काज सभागृहाचे होते की पक्षाचे ? असा प्रश्न निर्माण झाला होता. या गलास्थान कारभाराबाबत प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वारंवार सभेत लक्ष वेधण्यात आले. मात्र त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आम्ही सत्ताधाऱ्यांनी मंजूर करून घेतलेल्या ठरावावर आपली हरकत नोंदवत मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या सभागृहाच्या कामकाजामुळे सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. आणि सभागृहातून बाहेर पडलो. मात्र सभागृहातील चुकीची कामकाज पद्धत आणि सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभार या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे नागेंद्र परब यांनी सांगितले. २८ फेब्रुवारीला आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये गेल्या पाच वर्षात सुरू असलेला भ्रष्टाचार, मनमानी कारभार, विविध घोटाळे, स्वनिधी अनियमितता आदी विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना सदस्य आंदोलन करणार असल्याचेही नागेंद्र परब यांनी सांगितले. तो डाग जनताच पुसून काढणार : प्रदीप नारकर
जिल्हा परिषद मधील सत्ताधारी पदाधिकारी हे मनमानी कारभार करत आहेत. मी बांधेन ते तोरण आणि करेन ते धोरण असा प्रकार जिल्हा परिषद अध्यक्षांचा सुरू असल्याचा आरोप प्रदीप नारकर यांनी केला आहे. तर जिल्हा परिषद सत्ताधारी हे जिपला लागलेला डाग असून आगामी निवडणुकीत त्यांना घरी बसून जनता हा डाग पुसून टाकतील अशी टीका हि त्यांनी केली.
